कडा, युसूफ वडगाव, परळी येथे होणार जाहीर सभा ; छत्रपतींच्या दौर्याने होणार पंकजाताईंच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब
बीड : भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी छत्रपती उदयनराजे भोसले उद्या जिल्ह्यात येत आहेत. उद्या त्यांच्या तीन ठिकाणी जाहीर सभा होणार असून सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शनिवारी शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सभेनंतर उद्या छत्रपती उदयनराजे भोसले पंकजाताईंसाठी जाहीर सभा घेणार आहेत. उद्या शनिवारी सकाळी १० वा. कडा (आष्टी) येथे अमोलक जैन विद्यालय परिसर येथे, दुपारी १ वा. युसूफ वडगाव (केज) येथे बसवेश्वर चौक तर दुपारी २ वा. परळी वैजनाथ येथे मोंढा मैदान येथे उदयनराजे भोसले जाहीर सभेस संबोधित करणार आहेत. या तीनही सभेला उदयनराजे हेलिकॉप्टरने येणार असून सभेला पंकजाताई देखील त्यांच्यासमवेत असणार आहेत. दरम्यान, या सभेमुळे पंकजाताई मुंडे यांच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब होणार असून मतदारांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.