बीड तालुक्यातील टुकुर प्रकल्पासरख्या मागण्या बहीण-भाऊ मिळून सोडवतील – डॉ.योगेश क्षीरसागर
माजी आ.जनार्दन तुपे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
बीड – बीड तालुक्यासह सबंध बीड जिल्ह्यात आता पंकजाताईंच्या विजयाचे वारे वाहू लागले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बीडच्या बाबतीत माझ्याकडून चूक व अन्याय झाला परंतु यावेळी ही चूक भरून काढणार आहे. बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान देण्याचे व सबंध जिल्ह्याचे केंद्रात नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या पंकजाताईच्या रूपाने लोकसभेची उमेदवार आपण सक्षम दिली आहे त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केल्यानंतर बीड विधानसभेसाठी सुद्धा योग्य उमेदवार आपण देऊ व सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहू असे मत कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बीड येथील मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असून गेवराई तालुक्यात आगामी काळात कॉटन पार्क उभारणार असून यासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली त्याचबरोबर बीड तालुक्यातील पाण्यासाठी महत्त्वाचा असणारा टुकूर प्रकल्प व अन्य काही बंधारे व राठबंध गावांची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सबंध बीड जिल्ह्याच्या विकासाची ब्लू प्रिंटच उपस्थित त्यांच्या समोर मांडली.
सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी कमी भाव मिळाला त्यामुळे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 4000 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले असून आचारसंहिता संपल्यानंतर या पॅकेजच्या वितरणा संदर्भातील कारवाई सुरू करण्यात येईल असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
बीड जिल्ह्यात जातीसाठी माती खाणारे म्हणजेच आपल्या मतांचा चुकीचा वापर करणारे लोक नसून या मातीच्या विकासासाठी जातीपातीला बाजूला ठेवून विकासाला मतदानाचे सतपात्री दान करणारे लोक या जिल्ह्यात राहतात त्यामुळे आता मला माझा विजय स्पष्ट दिसू लागला आहे असे मत यावेळी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले. आपण मंत्री असताना बचत गटांसह महिलांच्या विकासासाठी केलेल्या विविध विकास कामे व योजनांचा पाढा वाचताना पंकजाताई मुंडे यांनी आगामी काळात देखील महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम हाती घेणार असल्याचे यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर तसेच युवा नेत्या सारिका ताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे बीड शहरातील आशीर्वाद लॉन येथे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नेते व माजी आमदार जनार्दन तुपे यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. बीड शहरासह संपूर्ण बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांनी विकासाचे बीज पेरले केंद्रात त्यांना त्यावेळी मंत्रीपदाची संधी मिळणार होती मात्र त्यांच्या शिक्षणातील अडचणीमुळे त्यांची ती संधी हुकली मात्र आता बीड जिल्ह्याची सुकन्या उच्चशिक्षित उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या रूपाने आता बीड जिल्ह्याला मोठी संधी मिळण्याची शक्यता असल्याचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी म्हटले. तसेच बीड तालुक्यातील विविध साठवण तलाव बंधारे एमआयडीसीचा विकास त्याचबरोबर कपिलधार तीर्थक्षेत्र विकास आणि प्रकल्पाचे रखडलेले काम हे मुंडे बहीण भावांनी मिळून मार्गी लावावेत असे आवाहनही डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका ताई क्षीरसागर यांनी तर सूत्रसंचालन वृत्त निवेदक सचिन जगताप यांनी केले. व्यासपीठावर माजी आमदार जनार्दन तुपे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, काकासाहेब जोगदंड, रमेश चव्हाण, अविनाश नाईकवाडे, रवींद्र कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रज्ञाताई खोसरे, युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रिया डोईफोडे, विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, यांसह आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे या मेळाव्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.