मोदींजींच्या विकासाची गॅरंटी बीड जिल्ह्यात पंकजाताईच राबवू शकतात – धनंजय मुंडेंचा विश्वास
मराठवाडा तुटीचे खोरे भरून निघाल्यास बीड जिल्ह्यात किमान 42 टीएमसी पाणी येईल, ऊस तोडणारे नाही तर पिकवणारे, ही ओळख करायची आहे
आष्टी येथे धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
आष्टी (प्रतिनिधी) – कोविड सारख्या महामारीच्या काळात दोनदा नव्हे तर तीनदा समस्त देश वासियांना मोफत लस देण्यात आली. ही लस देताना कोणाचीही जात धर्म न पाहता फक्त तो भारतीय आहे म्हणून त्यांना देण्यात आली. भारत देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोविड महामारीच्या काळात अनेक इतर देशांना मदत केली. आज कोट्यावधी कुटुंबांना मोफत राशन दिले जाते, ते सुद्धा कोणाचीही जात किंवा धर्म न पाहताच दिले जाते. याही पलीकडे जाऊन मोदीजींच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. त्याच प्रकारची प्रगती व विकास बीड जिल्ह्याला अपेक्षित असून, आता बीड जिल्हा सुद्धा जात-पात धर्म या गोष्टींना थारा न देता कर्तृत्व अंगी असलेल्या व विकासाची क्षमता असलेल्या नेतृत्वालाच लोकसभेत पाठवणार आहे, असे मत राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आष्टी येथे बोलताना व्यक्त केले आहे.
येत्या वर्षभरात केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून नगर – बीड – परळी हा रेल्वे मार्ग तर पूर्ण केला जाईलच, परंतु आणखी दोन वर्षाच्या आत याच रेल्वे मार्गावरून पंकजाताईच्या प्रयत्नातून परळी वरून मुंबईपर्यंत वंदे भारत सारखी स्पीड ट्रेन सुद्धा धावेल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आष्टी येथे महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मोरेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास धनंजय मुंडे यांनी संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची जी गॅरंटी देशाला दिली आहे, तीच विकासाची गॅरंटी बीड जिल्ह्याला केवळ आणि केवळ पंकजाताई खासदार म्हणून देऊ शकतात; असा विश्वासही यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
मराठवाड्याचे 165 टीएमसी पाण्याचे तुटीचे खोरे भरून काढण्याचा प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे तयार असून यासाठी सुमारे एक लाख 17 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्याबरोबरच बँकेकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी केंद्रात वजन असलेला खासदार आपल्याला निवडून द्यावा लागेल. या तुटीतून सुमारे 42 टीएमसी पाणी हे आपल्या बीड जिल्ह्याला मिळणार आहे. हे पाणी आल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी जलक्रांती होणार असून याद्वारे बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर क्षेत्र हे ओलिताखाली येईल आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत ऊस पिकवता येईल. त्यामुळे आपल्या भागातून बाहेर ऊस तोडायला जाणारा शेतकरी ऊसतोड कामगार न होता ऊस पिकवणारा बागायतदार होईल असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक, सुमारे 70 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप आतापर्यंत झाले आहे. कुणबी नोंदी शोधण्यात सुद्धा बीड जिल्हा मराठवाड्यात सर्वात पुढे आहे. सगे सोयरेचा जीआर काढण्यासाठी त्यावर आलेले आक्षेप निकाली काढून, तो मुद्दाही राज्य सरकार शक्य तितक्या लवकर निकाली काढणार आहे. त्यामुळे आम्ही व आमचे सरकार सगे-सोयरेच्या बाजूनेच आहोत, असे ठाम मतही यावेळी धनंजय मुंडे यांनी मांडले.
दरम्यान मला समोरून अनेक वेळा प्रश्न विचारले जातात की कृषिमंत्री म्हणून तुम्ही काय केले मला सांगायला निश्चितच अभिमान वाटतो की शेतकऱ्यांना पिक विमा भरायला स्वतःच्या खिशातून जो पैसा भरावा लागत होता तो मी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बंद केला असून आता शेतकरी केवळ एक रुपयातच पिक विमा भरू शकतो. पिक विमा बरोबरच शेतकऱ्यांना अवकाळी दुष्काळीचे अनुदान यासारख्या बाबींची ही व्यवस्था सरकारने केली. सोयाबीन व कापसाला सध्या कमी भाव असल्यामुळे जून महिन्यामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार कोटींचे पॅकेज राज्य सरकार देणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
आम्ही काय केले असे विचारणारे समोरचे उमेदवार त्यांच्या पाठीशी आम्ही सोबत राहून मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीड जिल्ह्यातून पाच लाख मते मिळवली ही पाच लाख लोक कोविड सारख्या संकटात असताना उमेदवार मात्र साखर झोपेत होते का असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. इथल्या खासदारांनी किंवा सरकारने काय केले हे विचारायला उमेदवार थेट पाच वर्षांनी एकदा येतात असा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केला.
आज समोरील उमेदवार हे जातीपातीचे राजकारण करत आहेत, त्यांनी अगदी सुरुवातीलाच स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले; त्यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र स्वतःचे कुणबी प्रमाणपत्र गुपचूप काढून घेऊन त्याचा राजकीय लाभ एका निवडणुकीत घेतला, त्याऐवजी वीस – पंचवीस हजार गोरगरीब व गरजू लोकांना या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळवून दिला असता तर खरेच यांच्या मनाचा मोठेपणा आम्ही पाहिला असता असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.
यावेळी आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.भीमराव धोंडे यांसह मान्यवरांनी आपले मत मांडत पंकजाताई मुंडे यांना आष्टी-शिरूर-पाटोदा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर आ.बाळासाहेब काका आजबे, मा.आ.भीमराव धोंडे, डॉ.शिवाजीराव राऊत, रामकृष्ण बांगर, वणवे दादा, वाल्मिक निकाळजे, किशोर नाना हंबर्डे, साहेबराव मस्के, दीपक घुमरे, शंकर देशमुख, विश्वास नागरगोजे, बबन अण्णा झाम्बरे, विठ्ठल सानप, भाऊसाहेब लटपटे, काकासाहेब शिंदे, अजय धोंडे, लालाभाऊ खुमकर, धैर्यशील थोरवे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, पप्पू गुंड, रघुनाथ शिंदे, हरिभाऊ जंजिरे, सतीश बडे, बबनराव आवळे, प्रफुल सहस्त्रबुद्धे, असताक शेख, नाजीम शेख यांसह आदी उपस्थित होते.