बीड चाईल्ड हेल्पलाईनच्या झटपट कारवाई मुळे टळला अनर्थ
Beed : काल चाईल्ड हेल्पलाईन बीड कार्यालयाच्या प्रसंगावधानामुळे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवीण्यात आल्याने सदरील मुलीला पुढील आयुष्य स्वेच्छेने जगण्याची दूसरी संधीच मिळाली आहे. बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा चाईल्ड हेल्पलाईन बीड कक्षाला सकाळी मिळाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली.
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत चाईल्ड हेल्पलाईन, बीड कार्यालय हे मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापासून मा.जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या आदेशावरुन कार्यान्वित करण्यात आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन कक्षाला १०९८ या टोल फ्री क्रमांका वरुन मुलांच्या काळजी व संरक्षणा संदर्भात विविध प्रकारची प्रकरणे मिळतात, उदा. बालविवाह, हरवलेली मुले, लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराची प्रकरणे, बेघर मुलांची प्रकरणे. या मध्ये माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाते.
बीड मधील मांजरसुंबा भागातील १६ वर्षाच्या मुलीचा बालविवाह आयोजित होणार आहे अशी गुपित माहिती बीड चाईल्ड हेल्पलाइनला सकाळी मिळाली, याच माहितीच्या आधारावर तातडीने नववधूच्या वयाची शहानिशा चाईल्ड लाईन च्या टीम ने केली. सदरील मुलगी अल्पवयीन असल्याचे मुलीच्या शाळेतील निर्गम उताऱ्यावरून पुढे आले.
कुटुंबातील पालकांना मुलींचा विवाह वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी न करण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकते याबाबत माहिती देण्यात आली.
सोबतच पालकांकडून मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच तिचे लग्न करणार असे, लेखी हमीपत्र घेण्यात आले.
केलेली कारवाई जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सुधीर ढाकणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली, जिल्हा परीविक्षा अधिकारी मंगेश जाधव, चाईल्ड लाईन जिल्हा समन्वयक अश्विनी जगताप, अंगणवाडी सेविका श्रीम.मीना फाटक, चाईल्ड लाईन सुपरवायजर प्रसाद पवार, प्रवीण वीर यांनी हे प्रकरण हाताळले.