बीड मतदारसंघातील बुथप्रमुखांना पंकजाताई मुंडेंनी दिला कानमंत्र
बुथप्रमुखांनी दिला ऐतिहासिक मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द
बीड ।लोकसभा निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या पुढील भवितव्याची नांदी ठरणारी आहे. त्यामुळे गावा-गावात अन् घरा-घरात जावून मतदारांशी संवाद साधा. देशपातळीवर सक्षम नेतृत्व आणि विकासाची गंगा आणण्यासाठी अधिकाधिक मतदान मिळवा. आज, आतापासून प्रचार कालावधी संपेपर्यंत प्रत्येकाच्या घरी जा व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतं मागा, असे आवाहन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
बीड मतदार संघातील बुथप्रमुखांचा मेळावा आज आशीर्वाद लाॅन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह बीड मतदार संघातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मी कधीच कोण्या व्यक्तीच्या विरोधात नसते तर मी भूमिकेच्या विरोधात असते. ही निवडणूक जिंकण्यासाठी बुथप्रमुखांनी आपापल्या गावांतील घरोघरी जावून जिल्ह्याच्या विकासासाठी मतदान मागावे, प्रेमानं जग जिंकता येतं. त्यामुळे प्रत्येकांशी संवाद अन् संपर्क कायम ठेवा. भाजपची विकासाची गाथा मतदारांपर्यंत पोहचवा असे आवाहन यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले. मी जिल्हा पिंजून काढत आहे. बैठका, मेळावे, गाठीभेटी, पदयात्रेतून अधिकाधिक मतदारांपुढे जावून मते मागत आहे, त्यामुळे मागे हटू नका, सक्रीयतेने व्यापक मताधिक्यासाठी बुथप्रमुखांनी काम करावं. आपला बुथ प्रत्येकाने सांभाळावा असेही त्या म्हणाल्या.
*बुध्दीभेदाच्या प्रचाराला बळी पडू नका*
—–
मुंडे परिवाराने कधीच जातीवादाला थारा दिलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून सुरु असलेल्या बुध्दीभेदाच्या प्रचाराला बळी पडू नका, प्रत्येक घटकांपर्यंत जावून त्यांना जिल्ह्याच्या विकासाची भूमिका तसेच देशपातळीवर पक्षाची भूमिका विषद करा असे सांगत पंकजाताई म्हणाल्या, बीड मतदार संघात आपल्या सर्वांकडून खूप सकारात्मक कामाची अपेक्षा मला आहे. गावागावात आपल्याला अधिकचे मतदान कसे मिळेल याकडे लक्ष द्या व त्याप्रमाणे काम करा. लोकांमध्ये जा,त्यांना समजावून सांगा असे आवाहन पंकजाताईंनी केले. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी बीड मतदार संघातील गावांचा बूथनिहाय बूथ प्रमुखांकडून आढावा घेतला. काही चुकलं असेल तर तुम्ही दुरुस्त करा, पण मनापासून कामाला लागा, विजय आपलाच आहे असा विश्वासही त्यांनी बुथप्रमुख,कार्यकर्त्यांना दिला. यावेळी बीड मतदारसंघातील बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.