भाशिप्र संस्थेच्या मतदार जागृती मेळाव्यात पंकजाताई मुंडेंना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार
जातीपातीच्या भिंती तोडून प्रज्ञावंतांनी मतदार जागृतीसाठी योगदान द्यावे
बीड । भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि मुंडे परिवाराचे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. तुम्ही सर्व सुशिक्षित आणि प्रज्ञावंत आहात. प्रज्ञावंत मतदार म्हणून तुम्ही नक्कीच जिल्ह्याच्या विकासाला योगदान देण्यासाठी तुुमचे अमूल्य मत मला द्याल ही खात्री आहे, मात्र तुमच्यासह आपल्यासाठी नकारात्मक असलेली वीस मते तरी प्रत्येकाने आपल्या बाजूने मिळवण्यासाठी भाजपची विचारधारा अन् देश विकासाचे धोरण मतदारांपर्यंत पोहचवावे असे आवाहन भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या आशीर्वाद मंगल कार्यालयात झालेल्या मतदार जागृती मेळाव्यात पंकजाताई मुंडे बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ.हेमंत वैद्य, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रवक्ते राम कुलकर्णी, उमेश जगताप,चंद्रकांत मुळे आदींसह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, संघ विचारसरणीत मोठे झालेल्या गोपीनाथराव मुंडे यांची मी कन्या आहे. त्यामुळे शिस्त आणि माझे कर्तव्य मला माहित आहे. या निवडणूकीत जातीपातीच्या भिंती तोडण्यासाठी प्रज्ञावंतांनी योगदान द्यावे. भाशिप्र संस्थेच्या सर्व प्रज्ञावंतांनी आपल्याविरुद्ध असलेली नकारात्मक मतेे सकारात्मक करण्यासाठी काम करावे. बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी मते मागत आहे. त्यात तुम्ही तुमचे सत्पात्री दान टाकावे असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले. आपण कोणीही जातीवादाला थारा देत नाहीत पण निवडणूक आली की, मुद्दाम विरोधकांकडून जात पुढे आणली जाते. यातून जोडलेली माणसं बाजूला करण्याच काम केलं जातं. मात्र ही लढाई आपल्याला बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जिंकायची आहे. पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणूकीत भाजप-महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. राजकारणात मुंडे परिवाराने कधीही जात-धर्माचा भेदभाव केला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मुंडे साहेबांचे संस्थेसाठी भरीव योगदान ; पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देऊ
प्रारंभी प्रास्ताविक भाशिप्रचे मुख्य प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे यांनी केले.दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेसाठी भरीव काम केले आहे हे आम्ही कधी विसरणार नाही.भा.शि.प्र.संस्थेच्या प्रत्येक संस्कार केंद्रातून पंकजाताई मुंडे यांना अधिकाधिक मतदान मिळवण्यासाठी आम्ही सर्व जण सामूहिक योगदान देऊ असं मुळे म्हणाले.याप्रसंगी राम कुलकर्णी म्हणाले, माझी माणसं, माझा जिल्हा या भावनेने पंकजाताई मुंडे काम करतात.भा.शि.प्र ही संस्था आणि मुंडे परिवाराचा खूप वर्षांचा ऋणानुबंध आहे. शिक्षण क्षेत्रात भरीव काम आपल्या संस्थेला मुंडे साहेबांच्या आणि नंतर पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना करता आले आहे त्यामुळे या निवडणुकीत पंकजाताई यांना प्रचंड मतांनी आपल्याला निवडून द्यायचे आहे असा संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे पंकजाताई यांचा विजय निश्चित आहे फक्त त्या किती लाख मतांनी निवडून येतील याची आम्हाला प्रतीक्षा आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी हेमंत वैद्य म्हणाले, भा. शि. प्र. संस्थेच्या सर्व कर्मचार्यांनी या निवडणुकीत मतदार जागृतीचे काम करावे. देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेत आणण्यासाठी बीड लोकसभा मतदार संघात पंकजाताई मुंडे यांना निवडून देण्यासाठी सर्व प्रज्ञावंतांनी योगदान देवून मतदान जागृती करावी. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था कायम पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, ताईंचा विजय निश्चित आहे असा विश्वास हेमंत वैद्य यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन उमेश जगताप यांनी केले.