उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद
जिल्हाप्रमुखपद सर्वसामान्यांसाठी की दादागिरीसाठी?
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिंदेगट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह 12 जणांवर कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांडे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर खांडेंना दिलेलं पद हे सर्वसामान्यांसाठी की दादागिरीसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.कुंडलिक खांडे हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्यामुळे या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणाची गंभीर दखल घेतील अशी अपेक्षा आहे.
ज्ञानेश्वर खांडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 2022-23 मध्ये ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आम्ही पॅनल टाकला होता. यामध्ये कुंडलिक हरीभाऊ खांडे यांनीसुद्धा पॅनल टाकला होता. यावेळी सुद्धा कुंडलिक खांडे, बाळू खांडे, गणेश खांडे यांच्याकडून मला सतत दबाव टाकण्यात येत होता. त्यानंतर धमक्यासुद्धा दिल्या जात होत्या. यासंदर्भात मी रितसर अर्ज पोलीस अधीक्षक यांनासुद्धा दिला होता. ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आमच्या पॅनलचे अविनाश पाटोळे, अजय राऊत हे दोनच सदस्य निवडूण आलेले आहेत. या दोन सदस्यांनी ग्रामपंचायतमध्ये आलेल्या कामांच्या अनुषंगाने माहिती अधिकाराचा अर्ज दिला होता. याचाच राग मनात होता. यासह मला जे उपजिल्हाप्रमुख पद मिळाल्यानंतर गावामध्ये मी बॅनर लावल्यानंतर या बॅनरवर कुंडलिक खांडे यांचा फोटो नसल्यामुळे तो सुद्धा राग कुंडलिक खांडे यांच्या मनात होता. 3 एप्रिलला बीडमधील काम उरकून मी व माझे मित्र अविनाश खांडे आणि शंकर राऊत आम्ही मित्र स्विफ्ट डिझायरमध्ये बसून साडेपाचच्या वेळेस गावी जात होतो याचवेळी शासकीय पॉलटेक्निक कॉलेजजवळ थोड्या अंतरावर पांढऱ्या रंगाची टाटा व्हिस्टा रस्त्याच्या मधोमध थांबल्याचे आमच्या निदर्शणास आले. याच दरम्यान थांबलेल्या गाडीने आमच्या गाडीला गाडी आडवी लावली, यामध्ये आमच्याच गावातील ओळखीचे सुनिल पाटोळे, बाबारतन पाटोळे, कृष्णा पाटोळे व
बीड येथील लाला दुनघव हे आमच्याकडे आले व त्यामधील बाबा पाटोळेने आमच्या गाडीची चावी काढून घेतली व आम्हास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान तिथे दोन मोटारसायकलवर चार जण तोंडाला रूमाल बांधून आमच्याजवळ आले त्यांच्या हातात लोखंडी रॉड, लाकडी दांडे होते. अनोळखी चार लोकांचे चेहरे हे रूमाल बांधल्यामुळे लक्षात आले नाहीत. ते म्हणाले तू गावामध्ये खूप मोठा झाला, उपजिल्हाप्रमुखपद घेतले यानंतर त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉड, लाकडी दांडे याने मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्यात लोखंडी शॉकअपने मारहाण केली. यावेळी मी माझ्या डाव्या हाताने डोक्यावरील मार आडवला असता हाताला जखम झाली. याच दरम्यान इतरांनीही मला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी माझे मित्र अविनाश खांडे व शंकर राऊत हे सोडवण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली. सध्या मी संचेती हॉस्टिल येथे ॲडमिट असून मला दोन्हीही हातापायाला गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीमध्ये उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांनी म्हटले आहे. या मारहाण प्रकरणी जिल्हाप्रमुख कुंडलिक उर्फ बापू हरीभाऊ खांडे, गणेश हरीभाऊ खांडे, नामदेव हरीभाऊ खांडे, गोरख उर्फ पप्पू शिंदे, बाबारतन पाटोळे, सुनिल पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला दुनघव सर्व रा.म्हाळसजवळा व इतर अनोळखी चार जणांवर ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून कलम 307, 336, 324, 141, 120 ब, 143, 147, 148, 149, 504, 506 भादंविनुसार बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.