मुख्यमंत्री, जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी
बीड प्रतिनिधी – रविवार (दि.२६) रोजी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
रविवारी (दि.२६) नोव्हेंबर रोजी बीड, शिरूर तालुक्यासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने अवकाळी पाऊस हे वैध आणि पूरक कारण दाखवून, झालेल्या नुकसानीची पीक विमा तक्रार क्रॉप इन्शुरन्स ॲपवर करण्यासाठी तलाठी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना कळवावे तसेच प्रशासनाने तातडीने घटनास्थळावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत. जेणेकरून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास शेतकरी बांधवांना मदत होईल. झालेल्या नुकसानीची भरपाई सरसकट शेतकरी बांधवांना देणेबाबत कार्यवाही करावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, तहसिलदार बीड व शिरूर कासार यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.