गेवराई प्रतिनिधी : गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 33 पैकी 17 ग्रामपंचायतीवर काही ठिकाणी स्वतंत्र तर काही ठिकाणी आघाडी करून शिवसेनेचा भगवा फडकला असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उमापूर रामपुरी रोहितळ या संख्येने मोठा असलेल्या ग्रामपंचायतीवरही मतदारांनी शिवसेनेलाच पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.
गेवराई तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी मतदान होऊन दिनांक 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या पॅनलला जनतेने भरभरून प्रेम दिले असून, 17 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना सत्तेत आली आहे. यापैकी उमापूर, रामपुरी, रोहितळ, भेंडटाकळी, पिंपळगाव कानडा, राहेरी, भेंड खुर्द-सुलतानपूर, नंदपुर-कांबी-लोणावळा, तळवट बोरगाव, पांढरी, सेलू ( युती) , कटचिंचोली, रसुलाबाद, शेकटा, चकलांबा (अपक्ष युती ), तांदळा, आगर नांदूर, गोपत पिंपळगाव (युती) या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सर्व विजयी उमेदवारांनी गेवराई शहरातील माजी बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भेट दिली असता, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित आणि जिल्हा परिषद चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांनी सर्वांचा सत्कार करून स्वागत केले.
यावेळी बोलताना बदामराव पंडित यांनी सर्व विजयी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन करून जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका गोरगरिबांची कामे जाणून घ्या आपल्या गावात सामान्य माणसाला कोणतीही अडचण आली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करून गावाच्या विकासासाठी उद्यापासूनच कामाला लागा अशा सूचना केल्या.