अंबाजोगाई । फेसबुकवर कर्जाची फसवी जाहिरात अपलोड करत त्याआधारे नागरिकाची 25 हजार रुपयांची फसवणूक केली गेली. यातील आरोपीला बीड सायबर पोलीसांनी नगर जिल्ह्यातून अटक केली.दरम्यान त्यास न्यायालयाने 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इमरान खान जब्बार खान (रा. फॉलोवर्स लाईन फुलवाली मस्जीद, अंबाजोगाई) हे शिक्षक आहेत. ते 2 ऑगस्ट 2023 रोजी मोबाईल वर फेसबुक पाहत होते. यावेळी शिवकृपा फायनास या फेसबुक आयडीवर लो सिबील लोन मिळेल अशी जाहिरात पाहिली होती. त्यांनी जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर जाहीरातीचा स्क्रिनशॉट काढुन व्हॉटसपव्दारे पाठविला. त्यानंतर नमुद मोबाईल क्रमाक धारकाने माझ्या सोबत चॅटींगव्दारे आधार कार्ड, पॅनकार्ड, पगारपत्रक, स्लीप बॅकेचे पासबुक व पासपोर्ट इत्यादी कागदपत्राचे फोटो व्हॉटसप व्दारे पाठविण्यास सांगितले. तसेच नंतर इमरान खान यांना संपर्क करुन प्रोसेसिंग फी, सर्व्हिस चार्ज, फाईल चार्ज, असे वेगवेगळे चार्जेससाठी 25 हजारांची मागणी केली. इमरान खान जब्बार खान यांनी ती रक्कम ऑनलाईन भरली. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बीड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरुन गुरन. 47/2023 कलम 420 भादवी सह कलम 66, 66 (क) मा.तं. अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व पो.नि.संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे उपनिरीक्षक जोगदंड, पोहेकॉ. भारत जायभाये, बप्पासाहेब दराडे, विजय घोडके, गिरी, पोना दरेकर व कर्मचार्यांनी तपास केला. गुन्ह्यातील सिमकार्ड अशोक कोंडीबा ढोले (रा.नवनाथनगर तांदळी धुमाळ,अहमदनगर) याचे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी श्रीगोंदा येथील स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सिम कार्डचा वापर करणार्या भाऊसाहेब अशोक ढोले याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. याला सायबर ठाण्यात हजर करून आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान त्याच्या अटकपूर्व अंगझडीत घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल मिळुन आला.सदर आरोपीस प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समोर हजर केले असता त्यांनी आरोपीस 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.