शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील कीर्तन महोत्सवात केले चिंतन
गेवराई प्रतिनिधी : मानव सेवेचा विचार आणि मानवतेची देणगी महाराष्ट्राला पावन केलेल्या संत महात्मे यांनी दिली, त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन दीन दुबळ्यांची आणि गोरगरीबांची सेवा करा. परमेश्वर त्यांच्यात आहे असे प्रतिपादन ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी केले. शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात कीर्तन सेवा करताना ते बोलत होते.
प्रकाश महाराज बोधले यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘ जे का रंजले गांजले ‘ या अभंगावर निरूपण केले. अध्यात्मा शिवाय माणसातले माणूसपण टिकणारे नाही. प्रगती जेवढी होईल, शिक्षण जेवढे जास्त होईल तेवढे अध्यात्माची गरज आहे. साधू कसा ओळखावा, देव कसा ओळखावा हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले आहे. समाजाच्या जीवनाला दिशा देण्याचे काम साधू संत करतात. आई आजीच्या मांडीवरचे संस्कार आज राहिले नाहीत, हा मोठा दुष्काळ आहे. सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, मदर तेरेसा आदी थोर विभुतींनी लोकांना जागृत केले. त्यांना शिक्षण दिले. तेच खरे साधूसंत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाईंच्या अंगावर लोकांनी शेण टाकले, ते त्यांनी सहन केले, त्यामुळेच आज आपण पाहतो की महिला सर्वोच्च स्थानावर विराजमान आहेत. तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रात उत्तुंग काम करणारे ते सर्व थोर साधू आणि देव आहेत. गरिबांना आपले म्हणायला शिका. समाजातील उपेक्षित घटक तुमच्या कामाचा केंद्रबिंदू ठरवा तेव्हा समाजाच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्या मनात चंद्र तारे असेपर्यंत राज करताल. पोरांनो शिक्षण डोळ्यासमोर ठेवा मोबाईल नको, उत्तम शिका, चांगले काम करा तरच पोरीचे बाप तुम्हाला शोधायला येतील. वाईट मित्राचा नादी लागून आयुष्य उध्वस्त करू नका. ज्ञानोबा तुकोबांनी अध्यात्मिक क्रांती केली. मानवता संतांनी दिली अठरापगड जातीच्या संतांनी सर्वांना एका सूत्रात बांधले. विचार आणि मानवतेची देणगी या संतांनी आपल्याला दिली. जगाच्या पाठीवर समाजाला आपलेसे करणारे संताशिवाय दुसरे कोणीही नाही असे सांगून ते म्हणाले की, मुलांनो आई बापाकडे लक्ष द्या तेच आपले आपले देव आहेत त्यांची सेवा करा तुमचेआयुष्य सुंदर होईल.
विकासाबरोबर सात्विकता शिवाजीराव दादांनी जपली
विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी आपले आयुष्य झिजवले, संस्कृती समृद्धी, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव दादा आहेत. विकासाबरोबर सात्विकता महत्त्वाची आहे, दादांनी ती जपली त्यांचा वाढदिवस हा सोहळा नाही तर तुम्हाला दिशा देणारा उपक्रम आहे. समाजाला नावेठेवून तो जवळ येत नाही त्याच्या पाठीवर हात ठेवला तर तो आपल्या जवळ येतो हे दादांनी जाणले होते. दादा नशीबवान आहेत. आरोग्य कसे असावे, कुटुंब कसे सांभाळावे, समाजात कसे वागावे याचा आदर्श आपण दादा कडून घ्यावा. दादांच्या माध्यमातून त्यांच्या पुढील पिढीने लोककल्याणासाठी काम करावे असेही ते म्हणाले .