अंतरवाली सराटी येथील सभेची मुळवाटी घेऊन आलोय: जरांगे
बीड: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे दि.१४ सभा होत असून त्यानिमित्ताने मराठा बांधवांना निमंत्रण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवार, शनिवारी बीड दौऱ्यावर होते. जरांगे पाटील यांनी दैवत मानलेल्या श्री क्षेत्र नगद नारायण गड येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी गडाचे महंत ह.भ.प.श्री.शिवाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांना आशीर्वाद दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला आहे; मात्र जरांगे पाटील हे मूळचे मातोरी (ता.शिरूर) येथील आहेत. जरांगे पाटील हे धाकटी पंढरी नगद नारायण गड येथील भक्त आहेत. याआधी त्यांनी जेव्हा जेव्हा बीडला यायचे तेव्हा, ते गडावर जात होते. गडावर फडकत असलेला भगवा ध्वज हा त्यांनीच सर्वांच्या सहकार्यातून उभा केला होता. आता दि.14 रोजी सराटी येथे होत असलेल्या सभेच्या निमित्ताने ते बीडच्या दौऱ्यावर होते.शुक्रवारी बीडमध्ये पहाटे जाहीर सभा घेतल्यानंतर शनिवारी बेलुरा येथे भेट देऊन नारायण गड येथे नगद नारायण गड दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत गडाचे विश्वस्त दिलीप गोरे ,बी बी जाधव, बळीराम गवते ,गोवर्धन काशीद ,मास्के राजेंद्र हे उपस्थित होते. गडावर समाधी दर्शन घेऊन त्यांनी गडाचे महंत ह.भ.प शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, श्री क्षेत्र नगद नारायण गड हे दैवत, श्रद्धास्थान आहे. याठिकाणी येऊन दर्शन घेतले की लढ्याला बळ येते. आज मी बीड जिल्ह्यातील विविध गावात जाऊन मराठा बांधवांना मुळवाटी दिली आहे. आपण सर्वांनी सभेला यावं, इतकंच आवाहन मी करायला आलो आहे. आपण सर्वांनी सराटी येथील सभेला घरचे कार्य समजून यावं, येताना लवकर निघून वेळेत पोहचावे असेही ते म्हणाले.