बीड : धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायण गड येथील विकास कामांमध्ये जाणिवपूर्वक खोडा घातला जात आहे. तयार केलेले अंदाजपत्रक जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यासाठी राजकीय दबावाखाली येऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी टाळाटाळ करत आहेत. यामधे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी विश्वस्त मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री क्षेत्र नारायणगड येथील विकास कामांसाठी 25 कोटी रूपयाचा अराखडा शासनाकडून मंजुर झालेला आहे. सदरील आराखडयातील विकास कामांसाठीचे तयार केलेले अंदाजपत्रके हे कोणाच्यातरी दबावाखाली येवुन जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्याकडे सादर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग बीड ही यंत्रणा जाणिवपूर्वक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे नारायणगडाच्या विकास कामांमध्ये व्यत्यय येत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी सदरील प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर श्री क्षेत्र नारायणगडच्या विकास कामांना पूर्ण करून घेण्यासाठी सदरील यंत्रणेला सुचित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर विश्वस्त अनिल जगताप, ॲड.महादेव तुपे, सी.ए बी.बी.जाधव, बळीराम गवते यांच्यासह ॲड.मंगेश पोकळे, राजेंद्र मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दीड महिन्यापासून टाळाटाळ
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात हा विकासकामाचे अंदाजपत्रके पडून आहेत. येथील अधिकाऱ्यांकडून केवळ राजकीय दबाव असल्याचे सांगितले जाते. नेमका कोणत्या पुढाऱ्यांचा राजकीय दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.