दु:ख नाहिसे करुन सुख देण्याची ताकत भागवत कथेत आहे—भागवताचार्य
शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने भागवत कथेस उत्साहात प्रारंभ
गेवराई प्रतिनिधी : गेवराईच्या पुण्यभुमीला जसा परमार्थाचा वारसा आहे तसा राजकारणाचा वारसा आहे. हा वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाताना शिवाजीराव दादांनी सदैव परमार्थाचा विचार केला. कधी कुणाला दुखावले नाही. सर्वांना सोबत घेऊन काम केले. राजकारण आणि धर्मकारणाचा समन्वय साधनारे दादा खरे महर्षी आहेत, दादा खरे किंगमेकर आहेत. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा हा सुखाचा सोहळा आहे. दु:ख नाहिसे करुन सुख देण्याची ताकत भागवत कथेत आहे आणि या सुखाच्या सोहळ्यात मला सहभागी होता आले हे माझे भाग्य आहे. आज गेवराईत झालेला माझा सत्कार हा माझा खरा गौरव आहे असे भावपूर्ण उद्गार भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांनी काढले. शिवाजीराव (दाद) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात श्रीमद् भागवत कथेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री शिवाजीराव (दादा ) पंडित यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवाचा आज प्रारंभ झाला. सकाळी गेवराई शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर दूपारी शिवाजीराव (दादा) पंडित आणि भागवताचार्य केशव महाराज उखळीकर
यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली संस्थान बोरीपिंपळगावचे ह.भ.प. नामदेव महाराज, भोजगाव संस्थानचे ह.भ.प. रघूनाथ महाराज निंबाळकर, ओंम ज्ञानेश अध्यात्म मंडळ राजपिंप्रीचे ह.भ.प. भाऊसाहेब महाराज जोशी, किर्तनकेसरी ह.भ.प.कृष्णा महाराज राऊत यांच्या हस्ते कलश आणि ग्रंथपुजन करण्यात आले. त्यानंतर केशव महाराज यांच्या अमृतवाणीतून भागवत कथेस प्रारंभ झाला.
यावेळी बोलताना केशव महाराज यांनी शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. आपल्या आयुष्याची ८६ वर्ष दादांनी लोकांसाठी काम केले. बरबाद झालेले संसार उभे केले. सहकार महर्षी दादांच्या मनात सदैव संतसेवेची ईच्छा आहे, म्हणून हे सुखसोहळे साजरे होतात असेही ते म्हणाले. श्रीमद् भागवत कथेत केशव महाराज उखळीकर यांनी अनेक दाखले देत कथेचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी त्यांना सुमधुर संगीत साथ अरुण महाराज स्वामी, सोमनाथ तळेकर, आकाश महाराज परळे, शिवानंद शेळके, अरुण पगारे यांनी दिली. कथेची सांगता गेवराई शहरातील पत्रकारांच्या हस्ते ग्रंथ आरतीने झाली.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवानेते रणवीर पंडित यांच्यासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भागवत कथा व कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, संस्थेचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता श्रीमद् भागवत कथेचे दुसरे पुष्प केशव महाराज उखळीकर गुंफतील. सायंकाळी ६ ते ८ भजनरत्न भाग्यश्री देशपांडे यांची बोलावा विठ्ठल अभंग संध्या होणार असून संध्याकाळी ८ ते १० या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा यांची किर्तन सेवा होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.