बीड येथील प्रशासकीय इमारत व संत भगवानबाबा योजनेतील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी मिळून सुमारे 41 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
मुंबई – कृषिमंत्री धंनजय मुंडे यांची आजच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाली असून, पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंच्या कामांचा धडाका आज पाहायला मिळाला आहे.
बीड येथील मुख्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 30 कोटी 95 लाख तर सामाजिक न्याय विभागांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड येथे मुलांचे वसतिगृह उभारण्यास 9 कोटी 99 लाख रुपये इतक्या रकमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली होती. तर सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेचे जनकच धनंजय मुंडे हे आहेत.
दरम्यान परळी येथील कृषी महाविद्यालय, सोयाबीन संशोधन केंद्र त्यापाठोपाठ आता बीड येथील प्रशासकीय इमारत व ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहाचा विषय मार्गी लागल्याने नव्याने पालकमंत्री म्हणून पुन्हा निवड झालेल्या धनंजय मुंडे यांच्या कामाचा उरक पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे.