मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन घटकासाठी 7751 लाभार्थी शेतकऱ्यांना निधीचे वितरण
बीड – एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवत बीड जिल्ह्यातील 7751 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबक व तुषार सिंचन या घटकांसाठी सात कोटी 17 लाख रुपये निधीचे वितरण केले आहे.
कमी पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खरीप हंगामात संकट ओढवले असल्याने धनंजय मुंडे यांनी याआधी देखील सोयाबीन पिकास जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना अग्रीम पीक विमा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पाठोपाठ आता ठिबक-तुषारचे अनुदान वितरण झाल्यामुळे याचाही हातभार शेतकऱ्यांना लाभणार आहे.
बीड जिल्ह्यातील 2019 – 20 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेतील तुषार व ठिबक सिंचनाचे अनुदान वितरण प्रलंबित होते. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑगस्ट महिन्याच्या मध्यास पावसाची आकडेवारी पाहता हा निधी तातडीने वितरित करण्याबाबत सूचित केले होते.
धनंजय मुंडे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील 2019-20 पासून ते आज पर्यंत प्रतीक्षेत असलेल्या व पात्र ठरलेल्या 7751 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख 36 हजार रुपये इतका निधी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वितरित करण्यात आला आहे.