उपोषणकर्त्यांची काळजी घेण्याची प्रशासनाला विनंती
बीड प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड तालुक्यातील वांगी येथे महादेव शेळके पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली. तसेच सकल मराठा शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने कुणबी मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणकर्त्यांचीही भेट घेऊन आ.क्षीरसागर यांनी जाहीर पाठिंबा दिला.
बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातंर्गत असलेल्या बीड तालुक्यातील वांगी येथे महादेव शेळके पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट घेऊन चर्चा केली. तसेच बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी समितीच्या वतीने मराठा व कुणबी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी श्री.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सामुहिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास लोकप्रतिनिधी या नात्याने भेट देऊन पाठींबा जाहीर केला. अनेक वर्षांपासून मराठा समाज बांधव आरक्षणासाठी शासनदरबारी लोकशाही मार्गाने मागणी करत आहेत. या दोन्ही ठिकाणावरील उपोषणकर्ते मराठा बांधव, भगिनी यांची मराठा आरक्षणाच्या मागणी व कुणबी प्रमाणपत्र संदर्भातील भावना लक्षात घेऊन याबाबत तात्काळ आपल्यावतीने शासनाकडे कळवावे. दोन्ही ठिकाणच्या उपोषणकर्ते समाजबांधव, भगिनींना कसल्याही प्रकारची शारीरिक इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी विनंती आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.