जिल्हा रुग्णालयाच्या ईमारतीचा प्रश्न पंकजाताईंमुळेच मार्गी – सलीम जहाँगीर
बीड ( प्रतिनिधी ) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तत्कालीन पालकमंत्री म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त 200 खाटांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. त्यांच्याच काळात या कामास तत्त्वतः मान्यता मिळलेली आहे. त्यांच्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्यामुळेच आता आजी -माजी मंत्री यांनी श्रेय घेण्याचा आटापिटा करू नये. आमदारांनीही फुकटचे श्रेय घेण्याचे उद्योग बंद करावेत. आधी करावे आणि मगच श्रेयासाठी पुढे यावे असे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी पत्रकात म्हटले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या जागेत 200 खाटांच्या विस्तारित रुग्णालय ईमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दि.10 ऑगस्ट 2017 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक लावली होती. या बैठकीला गृह विभागाचे सचिव, नगर पालिकेचे प्रतिनिधी यांनाही बोलावण्यात आले होते. त्याचेवळी मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाची जागा तातडीने आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेऊन जागेचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले असता त्यांनी दोनशे खाटांच्या रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली. त्यावेळी त्यांना या हॉस्पिटलची किती गरज आहे ते दाखवण्यात आले. त्यांनी तत्काळ मंत्रालयात संबंधित विभागांना आदेश दिले आणि त्यास तत्त्वतः मान्यता दिली. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी देखील याविषयी सतत पाठपुरावा केला होता. भाजप नेत्या पंकजाताईंमुळेच हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. राज्यात पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतांना त्यांना हा महत्वाचा प्रश्न सोडवता आला नाही. मात्र आता त्यालाच पुन्हा लोकांसमोर आणून विद्यमान पालकमंत्री आणि माजी मंत्री हे सर्व काही आम्हीच केले असा खोटा आव आणून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. तर विद्यमान आमदार देखील श्रेयासाठी पुढे आले आहेत. मात्र आजी – माजी मंत्र्यांनी श्रेय घेण्याआधी पंधरा वर्षे सत्ता असतांना हा प्रश्न का सोडविला नाही असा प्रश्न उपस्थित करता आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा उद्योग बंद करावा असे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.