जिल्हाधिकाऱ्याकडून तारीख पे तारीख
टँकर टेंडर प्रक्रियेस 31 तारखेपर्यंत मुदतवाढ
5 सप्टेंबरला होणार टेंडर प्रक्रिया ओपन
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसून जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अल्पपाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ही टेंडर प्रक्रिया 13 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यात पहिली मुदतवाढ 25 ऑगस्ट 2023 करण्यात आली होती. यामध्ये मुदतवाढीचे कारण असे लिहिण्यात आले होते की यात स्पर्धा झाली नव्हती या हेतूने स्पर्धा व्हावी यासाठी पहिली मुदतवाढ देण्यात आली होती. यात परत आता मुदतवाढ दिली असून ही मुदतवाढ 31-8-2023 दिली असून ही प्रक्रिया 5 सप्टेंबरला ओपन होणार आहे. ही टेंडरप्रक्रियाच मॅनेज करण्याचा प्रकार सुरू असल्याच्याही हलचाली दिसत आहेत. सत्ताधारी नेत्यांकडून आपल्याच ठेकेदाराला याचे टेंडर मिळावे यासाठी सुद्धा सुत्रे हलवण्यात येत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून लातूर येथील वतन या ठेकेदाराकडे टँकरचे टेंडर होते परंतु यावेळी नवीन ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. परंतु यात सुद्धा आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी नेतेमंडळी कामाला लागले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये तीन ते चार वर्षाला दुष्काळ पडतोच, दुष्काळ पडल्यानंतर ग्रामीण भागातील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा पावसाचे तीन महिने संपले असून यावेळेस जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट गडद झाले असून येणाऱ्या दिवसात जर जिल्ह्यात पाऊस पडला नाही तर परत जिल्हावासीयांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. या संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाच्या वतीने टँकर टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असून शासनाच्या नियमाप्रमाणे 270 रुपये पर टन पर केमी दर ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये डिझेलसाठी 3 रुपये 40 पैसे पर टन पर केमी दर असणार आहे. या नियमाप्रमाणे अनेक ठेकेदारांनी टेंडर ऑनलाईन पद्धतीने भरलेले आहे. परंतु यामध्ये संबंधित ठेकेदाराला हे टेंडर मिळावे यासाठी जिल्ह्यातील काही सत्ताधारी मंडळी या टेंडरसाठी विशेष वजन वापरत आहेत. पहिली मुदतवाढ दिल्यानंतर दुसरी मुदतवाढ देण्याची गरज नसताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी दुसरी मुदतवाढ दिल्यामुळे या टेंडर प्रक्रियेला वेळ लागत आहे. येणाऱ्या 5 सप्टेंबर 2023 ला ही टेंडर प्रक्रिया ओपन होणार असून या प्रक्रियेत आपल्याच मर्जीतील ठेकेदार असावा अशी भावना सत्ताधाऱ्यांची आहे.