बीड (प्रतिनिधी) होळी आणि धुळवड रविवार आणि सोमवारी येत आहेत. या दोन्ही दिवशी बियर बार, बियर शॉपी यांच्यासह गावठी आणि हातभट्टी दारू विक्री पूर्णपणे बंद ठेवावी. ज्या घरातील लोक दारू पितात, त्यावर महिलांनी लक्ष ठेवून त्यांना दारू पिण्यापासून रोखावे. कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या काळामध्ये यावर्षी देखील होळी आणि धुळवड पारंपारिक पद्धतीने करावी. मात्र ती घरातल्या घरात साजरी करणे आवश्यक आहे. दारू विक्रीच्या प्रत्येक विक्री केंद्रावर आणि हातभट्टीच्या ठिकाणी पोलिसांनी लक्ष देऊन दारू विक्री होत असेल तर कारवाई करावी.
अधिकृत दारू विक्रीला परवानगी नाही. सामाजिक स्वास्थ्य आधारित राहण्यासाठी धुळवडीच्या दिवशी दारू विक्री करू नये. तसेच रविवारी आणि सोमवारी देखील दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे लपून छपून दारू विक्री करू नये. पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याने यावर बारकाईने लक्ष ठेवावे.
सन पारंपारिक पद्धतीने साजरे करणे आवश्यक आहे. मात्र धकाधकीच्या या काळामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी, सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी दारू विक्री आणि दारू पिण्यावर बंधन आले पाहिजे. हे बंधन आणण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांसह शहरी भागातील महिलांनी देखील दारुड्या वर लक्ष ठेवायला हवे.
पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने कारवाई करेल. मात्र गावकऱ्यांची देखील नैतिक जबाबदारी आहे की, त्यांनी आपापल्या गावातील बेकायदेशीर दारू रोखली पाहिजे. धुळवडीच्या दिवशी आज तागायत अनेक अपघात झालेले आहेत. अनेक जीव गमावले आहेत. यातून अनेक कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. हे सर्व भान जनतेने ठेवले पाहिजे. त्यामुळे पोलिसांसह ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील आपापल्या पातळीवर दक्षता बाळगावी. महिलांनी पिदाड्यांना रोखावे, असे आवाहनही अँड. देशमुख यांनी केले आहे.