वॉटर ग्रीड व जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडे स्वतंत्र बैठक लावण्याबाबत विनंती करणार
पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी यंत्रणा राबवू
कापसावर काही जागी लाल्या सदृश रोग पडल्याच्या तक्रारी, तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश
मुंबई – राज्यात कालपासून पावसाने पुन्हा एकदा सर्वदुर हजेरी लावली असून, कृषी विद्यापीठामधील तज्ञांच्या मते 22 जुलै किंवा 31 जुलैपर्यंत ज्या पेरण्या होतील किंवा पुर्ण झालेल्या असतील, ते बियाणे न उगवल्याने किंवा अन्य कारणाने शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट आल्यास राज्य सरकार शेतकर्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील व शेतकर्यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देईल; असे आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेतील एका लक्षवेधीच्या प्रश्नावर बोलताना दिले आहे.
राज्यात व विशेष करून मराठवाड्यात कमी पाऊस झाला असून, दुबार पेरणीचे संकट तसेच पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याच्या संभाव्य संकटाबाबत विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठनेते हरिभाऊनाना बागडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या प्रश्नावर धनंजय मुंडे बोलत होते. या चर्चेत मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, बबनराव लोणीकर, राजेश टोपे, नारायण कुचे, विजय वडेट्टीवार, दिवयानी फरांदे, कुणाल पाटील आदि सदस्यांनीही आपल्या भागातील प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान ग्रामीण भागात जी गावे जलयुक्त शिवार टप्पा-1 मध्ये घेण्यात आली नव्हती किंवा ज्या गावांत पाणलोटची कामे झालेली नाहीत. अशा पाच हजार गावांचा जलयुक्त शिवार टप्पा-2 मध्ये समावेश करण्यात आला असण्याची माहिती धनंजय मुंडे यांनी बोलताना दिली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या वॉटरग्रीड प्रकल्प व जायकवाडीच्या पाण्याची तुट भरून काढण्याच्या मुद्दयांवर बोलताना धनंजय मुंडे यांनी मराठवाड्याच्या दृष्टीने या दोन्ही बाजु अत्यंत आवश्यक असून, या संदर्भात जलसंपदा विभागाकडे स्वतंत्र बैठक लावण्याबाबत विनंती करणार असल्याचे सांगितले.
पी.एम. किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी के.वाय.सी. अपडेट करण्यापासून काही पात्र शेतकरी वंचित असल्याची बाब आ.नारायण कुचे यांनी उपस्थित केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी या बाबत बोलताना पी.एम. किसान योजनेतील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी गतीमान यंत्रणा राबविण्यात येईल असेही सभागृहास आश्वस्त केले.
धुळे जिल्हयासह काही ठिकाणी नविन उगवलेल्या कपाशीवर लाल्या सदृश्य रोग पडल्याच्या बर्याच तक्रारी शेतकरी, शेतकरी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी कळवल्या आहेत; याबाबत कृषी व महसूल विभागास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.