रामकृष्ण लॉन्स येथील घटना, शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल; रामकृष्ण मंगल कार्यालयावर गुन्हा का नोंद नाही
आई-वडील, भटजीसह, मंडपवाले, स्वयंपाकी, वर्हाडींवर गुन्हे दाखल
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील रामकृष्ण मंगल कार्यालय याठिकाणी अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी व शिवाजीनगर पोलीसांनी त्याठिकाणी जावून बालविवाह रोखत आई-वडिल, मामा-मामी, आजी-आजोबा, भटजी, मंडपवाले, स्वयंपाकी यांच्यासह वर्हाडी मंडळी असे एकूण 200 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा मंडपवाले, स्वयंपाकी यांच्यावर गुन्हा नोंद होतो मात्र ज्या मंगल कार्यालयामध्ये लग्न होत होते त्या मंगल कार्यालयावर गुन्हा का नोंद होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले असून बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. बालविवाहच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना केल्या असल्यामुळे बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश येत आहे. काल बीड शहरातील रामकृष्ण मंगल कार्यालय याठिकाणी एका 17 वर्षीय मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी व पोलीस प्रशासनाला मिळाली होती. याटिमने त्याठिकाणी जात बालविवाह रोखत मुलीचे आई-वडील, मामा-मामी, आजी, फोटोग्राफर यांच्यासह वर्हाडी मंडळ असे एकूण 200 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे,मंगेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते तत्वशिव कांबळे, सारिका यादव व पोलीस प्रशासनाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लोंढे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार, पोलीस कर्मचारी वासूदेव मिसाळ, उज्वला जोगदंड यांनी केली.