बीड : शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील सावतामाळी चौक ते नेत्रधाम सावरकर महाविद्यालय रस्त्याचे आणि नालीचे कामे सुरू आहे. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला.
या ठिकाणी रस्ता व नालीचे काम सुरू असुन स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत काही ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाली चे अर्धवट काम झाले असून अर्धवट नाली खोदून ठेवली आहे. यामुळे पाऊस पडल्यावर त्या खोदलेल्या नालीत पाणी साचून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामाची माहिती डॉ.योगेश क्षीरसागर यांना देत पाहणी करण्याची विनंती केली. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी काल या ठिकाणी जाऊन पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी नाली चे राहिलेल्या काम पूर्ण करण्याबद्दल सूचना दिल्या, शहरवासीयांना पावसाळ्यात रस्ते नाल्यांच्या अर्धवट कामामुळे त्रास सहन करावा लागणार नाही याची खबरदारी घेऊन ही अर्धवट कामे पूर्ण करा असे निर्देश दिले. तसेच सेन्ट एन्स स्कूल या शाळेच्या बाजूच्या नालीचे काम देखील तात्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या. शाळा सुरू झाली आहे. नालीचे काम झाले तर त्या ठिकाणी पालकांना पार्किंग साठी जागा उपलब्ध होईल व रस्त्यावर वाहतुकीला अडथळा येणार नाही. यावेळी गुत्तेदार यांनी देखील दोन दिवसात नालीचे काम पूर्ण करू असे सांगितले.
यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, शहरातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र काम करत आहोत. शहराच्या विकासात मूलभूत सुविधांचा प्राधान्य दिले पाहिजे. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहून प्रश्न सोडवत आहोत. या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.
या रस्त्यावर दवाखाने, शाळा, दुकाने असल्याने या रस्त्यावरून अनेक वाहने ये जा करतात. या रस्त्यावरील वाढणाऱ्या रहदारीसाठी हा रस्ता दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने तयार करण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यात हा रस्ता चांगला राहील. डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुत्तेदारासह संबंधित यंत्रणेला धारेवर धरून नाली कामाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक बाबुराव दुधाळ यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.