बीड : जिल्ह्यातील १३९४ पैकी ६५६ लहान मोठ्या गावात स्मशानभूमीची सोय नसल्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार दरम्यान मृतदेहाची हेळसांड होत असुन अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची सुद्धा दुरावस्था झाली असुन अंत्यसंस्कार दरम्यान काही गावांमध्ये ग्रामस्थांमध्ये वादविवाद होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडत
असुन जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सूद्धा गांभीर्य नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ जुन सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सरण रचुन ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनात शेख युनुस, बलभीम उबाळे,मुबीन शेख, मुस्ताक शेख, रामनाथ खोड, अशोक येडे , बाळासाहेब मुळे आदी सहभागी होते.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना दिले.
.
स्मशानभूमीसाठी गायरान जमिनीतुन जागा द्यावी , स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे
—
काही गावात स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतच्या मालकी हक्काची जागा नसते त्यामुळे उघड्यावर अंत्यसंस्काराची वेळ येते त्याठिकाणी शासनाने गायरान जमिनीतुन जागा उपलब्ध करून द्यावी.काही गावात स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अडवला गेला आहे त्यामुळे वादविवाद निर्माण होतात त्यामुळे वादविवाद टाळण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत.
वादांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याच्या घटना
—
काही गावांमध्ये विशिष्ट समाजासाठी स्मशानभूमी असते.त्याशिवाय काही गावात शेतालगत अंत्यसंस्कार केले जातात.परंतु तेथील शेतकऱ्यांचा विरोध असतो.काही शेतकरी अतिक्रमण करतात त्यातुन तंटेवाद निर्माण होतात.केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) या ठिकाणी ३ महिन्यात ३ मागासवर्गीय समाजाचे अंत्यविधी रोखण्याचा प्रकार घडला होता तर परळी तालुक्यातील वडखेल या गावात स्मशानभूमीवर अतिक्रमण असल्याने प्रेत शेतावर जाळण्याची वेळ आली होती.
जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नाही ,केवळ प्रस्तावाचे पत्रक काढून नामानिराळे
—
बीड जिल्ह्यातील स्मशानभूमीची सोय नसल्याने पावसाळ्यात मृतदेहाची हेळसांड होत असुन तसेच अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीची दुरावस्था असुन शेडचे पत्रे उडून गेलेले, बांधकाम पडलेले, अतिक्रमणामुळे रस्त्याची सोय नाही आदि कारणांमुळे ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रसंग घडुन मृतदेह तहसिल कार्यालयात आणण्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. वरील प्रकरणात डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.ज्ञानेश्वर मोकाटे यांनी जिल्ह्यात स्मशानभूमी बांधकामाची आवश्यकता असलेल्या ग्रामपंचायतींनी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परीषदेच्या पंचायत विभागाला प्रस्ताव सादर करावेत अशा सुचना दिल्या होत्या मात्र या घटनेला ७ महिने उलटून सुद्धा अद्याप बांधकाम अथवा दुरूस्तीचे कामच सुरू नाही.