कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच का?
उलट त्या शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल; गेवराई पोलीस ठाण्याचा प्रताप
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेवराई पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या कानडी-पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याचा त्यांच्या भावकीतील एकाने कोठा जाळला, जाण्या येण्याचा रस्ता आडवला यासह जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. एवढे करुन सुद्धा गेवराई पोलीस गुन्हा का नोंद करत नाहीत? उलट ज्यांचा कोठा जाळला व ज्यांना जिवे मारण्याची धमकी दिली त्यांच्यावर गेवराई पोलीसांनी गुन्हा नोंद केला? या प्रकरणी कोठा जळालेल्या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षकांना न्यायासाठी निवेदन दिले आहे.
मुरलीधर लक्ष्मण वराट रा. पिंपळगाव ता. गेवराई जि.बी. यांच्या शेतातील कोठा त्यांच्याच भावकीतील प्रेमराज अच्युतराव वराट यांनी जाळल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यात दोन लाखाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. यासह जाण्या येण्याचा रस्ता आडवला असून जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचे निवेदनात मुरलीधर यांनी म्हटले आहे. यासह एवढे होऊन सुद्धा पुढच्यावर गुन्हा नोंद करण्याऐवजी आमच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी मुरलीधर यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.

















