पाटोदा, आष्टी, बीड, धारूर, परळी या वनपरिक्षेत्रात होणार लागवड
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड जिल्ह्याला चार-पाच वर्षाआड दुष्काळाचा सामना करावाच लागतो, कारण बीड जिल्ह्याला वनक्षेत्र कमी असल्यामुळे निसर्गाचा समतोल जिल्ह्यात राहिलेला नाही. यामुळे येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो, बीड जिल्ह्यात फक्त 2.40 टक्केच वनक्षेत्र असल्यामुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या सर्व बाबींच्या अनुषंगाने वनविभागाने या पावसाळ्यात सहा लाख 71 हजार पाचशे झाडांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. ही वृक्षलागवड 171 हेक्टरमध्ये होणार असून पाटोदा, आष्टी, बीड, धारूर, परळी या वनपरिक्षेत्रात ही लागवड करण्यात येणार आहे. यासह जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा या मोहिमेमध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. जिल्ह्याचे वनक्षेत्र लक्षात घेता फक्त वनविभागानेच यात पुढाकार घेवून जमणार नाही तर नागरिकांनी सुद्धा वृक्षलागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेवून एका व्यक्तीने किमान दोन झाडे लावली तर भविष्यात जिल्ह्यातील परिस्थिती बदलू शकते.
बीड जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. यंदा तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वात जास्त तापमानाचा सामना सुद्धा बीडकरांना करावा लागला. या सर्व समस्या बीड जिल्ह्यात उद्भवण्याचे कारण म्हणजे बीड जिल्ह्यातील वनक्षेत्र अल्पसे असणे, बीड जिल्ह्यात फक्त 2.40 टक्केच वनक्षेत्र असल्याने वर्षानुवर्षे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमी होत चालले तर उष्णतेचे प्रमाण वाढू लागले आहे. खऱ्या अर्थाने जर निसर्गाचा समतोल जिल्ह्यात राखायचा असेल तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची गरज आहे. सध्या वनविभागाने या पावसाळ्यामध्ये सहा लाख 71 हजार पाचशे वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला आहे. ही वृक्षलागवड जिल्ह्यातील वनविभागाच्या 171 हेक्टरमध्ये होणार आहे. यामध्ये पाटोदा, आष्टी, बीड, धारूर, परळी या वनपरिक्षेत्रामध्ये ही लागवड करण्यात येणार आहे. वृक्षलागवडीत फक्त वनविभागानेच पुढाकार घेवून चालणार नाही तर या मोहिमेमध्ये बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान दोन झाडे लावली तर भविष्यात बीड जिल्ह्यात उद्भवलेल्या समस्या नाहीशा होतील तर जिल्ह्यातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनाच यश येईल. यामुळे या पावसाळ्यामध्ये सर्वांनीच किमान दोन झाडे लावून ती जोपासण्याची गरज आहे.
वृक्ष लागवडीमध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा
जिल्ह्यातील निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही या पावसाळ्यात जिल्ह्यात 6,71,500 झाडांची लागवड करणार आहोत. या मोहिमेमध्ये बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा सहभाग घ्यावा तसेच जिल्ह्यात कुठे विनापरवाना वृक्षतोड होत असेल तर वनविभागाशी संपर्क साधावा.
अशोक काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बीड