अमर नाईकवाडे यांचा पाठपुरावा अन न्यायालयाच्या दट्टयाने कारवाई
बीड : येथील डॉ. बाबु जोगदंड यांच्या ‘डीबी कन्स्ट्रक्शन’ ला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने काळया यादित टाकले आहे. कंत्राट मिळविण्यासाठी बनावट वर्कडन, वर्क इन हॅंड आणि क्वान्टिटी कागदपत्रे तयार केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात अमर नाईकवाडे यांनी एप्रिल 2022 मध्ये तक्रार केली होती. त्यांनीच याचा सातत्याने पाठपुरावा केला, परंतु अधिकारी दबावाला बळी पडून कारवाई करत नसल्यामुळे अखेर अमर नाईकवाडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली.
डॉ. बाबु जोगदंड यांच्या “डीबी कन्स्ट्रक्शन” ने बनावट कागदपत्रे तयार करुन कंत्राट मिळविल्याची तक्रार अमर नाईकवाडे यांनी एप्रिल २२ मध्ये केली होती. मात्र बांधकाम विभागाने यात काहीच कारवाई केली नाही. नाईकवाडे यांनी स्वत: पाठपुरावा करुन एमएसआरडीसी कडून ‘डीबी कन्स्ट्रक्शन’ने दाखल केलेली कागदपत्रे बोगस असल्याचा अहवाल जुन २२ मध्ये मिळविला होता. त्यानंतर तरी ‘डीबी कन्स्ट्रक्शन’वर कारवाई अपेक्षित होती. मात्र यात वरिष्ठ पातळीवरुनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यामुळे अखेर नाईकवाडे यांनी नोव्हेंबर २२ मध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यावर प्रतिवादींना नोटीस काढण्यात आल्या. त्याची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. यात न्यायालयात तोंडावर आपटण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या निर्देशांवरुन सार्वजनिक बांधकाम विभाग बीडच्या कार्यकारी अभियंत्यांनी ‘डीबी कन्स्ट्रक्शन’ला काळयायादित टाकण्याचे आदेश काढले आहेत. डॉ. बाबु जोगदंड यांना हा मोठा धक्का आहे.
—
दाखल व्हायला हवेत गुन्हे
एखाद्या कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे तयार केल्यास त्याच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत. डीबी कन्स्ट्रक्शन ने दाखल केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे ८ महिन्यापासून स्पष्ट झाले आहे. मात्र बांधकाम विभाग अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल करित नाही. हे गुन्हे तातडीने दाखल व्हायला हवेत अशी मागणी यातील तक्रारदार अमर नाईकवाडे यांनी केली आहे.