एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश दिल्यावरून केली टीका
बीड : आधीच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत हातमिळवणी करून हिंदुत्व सोडलेल्या उद्धव ठाकरे यांनी आता कट्टर शत्रुत्व असलेल्या एमआयएम पक्षातील नेत्यांनाही पक्षप्रवेश द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही निजाम सेना झाली असल्याची जहरी टीका बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, बीड येथील नगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या शेख निजाम यांना आता जनाब उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश देत स्वतः शिवबंधन बांधले आहे. याच निजाम शेख यांनी गत निवडणुकीत हिंदुंना शिव्यांची लाखोली वाहिली होती. हेच निजाम वेळोवेळी शिवसेनेला आणि शिवसैनिकांना त्रास देत होते. हे सर्व विसरून मुस्लीम मतांवर डोळा ठेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेश दिला आहे. एमआयएम या पक्षाने सातत्याने हिंदूंना डिवचण्याचे काम केले आहे. हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा सतत प्रयत्न करतात, हे सर्वश्रूत आहे. याबाबत सामान्य शिवसैनिक कायम आक्रमक भुमिका घेत. परंतु, ठाकरे कुटुंबिय मात्र चकार शब्द काढत नाहीत. आता तर त्यांनी एमआयएमच्या पदाधिकार्यांना प्रवेश देऊन एकप्रकारे ठाकरे शिवसेना ही निजाम सेना झाली असल्याचेच जाहीर करून टाकले आहे. हिंदूविरोधी नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याचे पाप ठाकरे यांच्या हातून घडले असून त्यांना येत्या काळात त्याची किंमत मोजावी लागणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे शिवसेनेला या दुटप्पीपणाचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. तसेच, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चालवित आहेत. त्यामुळे ठाकरे शिवसेनेने यापुढे हिंदूत्वाच्या गप्पा मारणे देखील बंद करावे, असे आव्हान बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिले आहे.