गेवराईत हजारोंच्या उपस्थितीत भव्य कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता
गेवराई:
स्पर्धेच्या अन् धावपळीच्या युगात आपण आपला आनंद हरवत चाललो आहोत. प्रत्येकाला आपल्या धर्माकडे, ध्यानाकडे, तसेच योगाकडे वळावे लागेल कारण हि काळाची गरज आहे. तसेच साधू- संतांच्या कृपेशिवाय जीवनात प्राप्ती नाही म्हणून संताच्या सानिध्यात राहून प्रत्येकाने भक्तिभावाने देवाचे नामस्मरण करावे. मानवी जीवनात साधू- संताच्या सानिध्यातच खरा आनंद मिळतो म्हणून साधु संंताच्या संगतीत रहावे. संत भाऊ-बाबा हे थोर संत होवून गेले आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसन आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला तर साधू – संत हे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी काम करतात असे प्रतिपादन श्री क्षेत्र सिध्देश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी व्यक्त केले.
गेवराई येथे संत भाऊ-बाबा सेवा प्रतिष्ठान, यांच्या वतीने संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाईक नगर येथे सुरु असलेल्या १८ व्या कीर्तन महोत्सवाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवार, दि.१५ जानेवारी रोजी ह.भ.प.स्वामी विवेकानंद शास्त्री मठाधिपती, सिध्देश्वर संस्थान, शिरुर (का.) यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली यावेळी ते बोलत होते.
जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहीभात ॥ वैकुंठी तो ऐसे नाही । कवळ काही काल्याचे ॥ एकमेका देऊ मुखी । सुखे घालु हुंबरी ॥
तुका म्हणे वाळवंट । बरवे नीट उत्तम ॥ या अंभगावर चिंतन केले. पुढे बोलताना विवेकानंद शास्त्री म्हणाले की दहिभाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्म घेऊ हा मधुर काला वैकुंठाताही मिळत नाही आणि म्हणून आम्ही हे काल्याचे घास एकमेकांच्या मुखात घातल्यापासून मिळणाऱ्या आनंदात हुंबरि घालू यासाठी वाळवंट हे स्थान उत्तम आहे. जीवा- शिवाचा ऐक्य करणारा म्हणजे काला होय. धावपळीच्या काळात काही गोष्टी मनावर न घेता सोडून दयायला शिका, टेन्शनमुक्त रहा. शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळाकडेही लक्ष द्यावे असा मौलिक सल्लाही उपस्थितांना दिला. यावेळी विणेकरी म्हणून विठ्ठल महाराज देशमुख, हार्मोनियमवादक उत्तमनाना मोटे, मृदंंगाची साथ दत्तात्रय सटले, गायनाचार्य इंद्रजित महाराज येवले,नाना महाराज कवडे, ज्ञानेश्वर महाराज औटे, साबुर्डे महाराज, बोंदरे महाराज, बोडखे महाराज, दिपक छेडेदार, कृष्णा महाराज बादाडे सह यमाईदेवी वारकरी शिक्षण संस्थेतील बालगोपालांची साथ संगत लाभली. यावेळी महिलांसह पुरुष भाविकांची किर्तन श्रवणासाठी मोठ्या संख्येने गर्दी होती. कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. किर्तनसेवेप्रसंगी सात दिवस संत भाऊ- बाबा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे, सचिव शिवाजीमामा ढाकणे, कोषाध्यक्ष भास्कर ढाकणे,कार्याध्यक्ष गोपीनाथ घुले,बापुराव घुले, किशोर जवकर,डॉ सुभाष ढाकणे, अर्जुनराव बारगजे, प्रविण फुलशंकर,विष्णुपंत पानखडे, गणेशराव भुकेले, शिनुभाऊ बेदरे, जिवनराव वराड, कुमारराव ढाकणे, परमेश्वर अंतरकर सह आदी पदाधिकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.