*जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; टेस्टिंग सेंटरमध्ये वाढ होणार*
बीड (प्रतिनिधी):- कोरोनाची टेस्ट न करता दुकान उघडणार्या व्यापार्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र प्रशासनाने व्यापार्यांना थोडी सवलत देवून अँटीजन टेस्ट करून घेण्यासाठी वेळ वाढवून द्यावा आणि शहरात टेस्ट सेंटर वाढवावेत अशी मागणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलिम जहाँगिर यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. व्यापार्याने टेस्ट करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप आणि शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने व्यापार्यांना अँटीजन टेस्ट बंधनकारक केले आहे. दोन वेळा संधी देवूनही काही व्यापार्यांनी टेस्ट न केल्यामुळे प्रशासनाकडून दुकाने सील करण्याची कारवाई केली जात आहे. आधीच सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत थेट सील ठोकले जात असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढत आहेत. प्रशासनाने अशा व्यापार्यांवर थेट कारवाई न करता त्यांना अँटीजन टेस्ट करून घेण्यासाठी वेळ द्यावा. त्याचबरोबर शहरातील अँटिजन तपासणी केंद्रावर होत असलेली गर्दी पाहता आणखी टेस्टिंग सेंटर वाढवावेत अशी मागणी सलीम जहाँगीर यांनी केली आहे. यावेळी नूर लाला खान उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीला प्रतिसाद देत आणखी चार सेंटर वाढविण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाकडून कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे व्यापार्यांनीही कसल्याही प्रकारची भिती न बाळगता अँटीजन टेस्ट करून घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सलिम जहाँगिर यांनी केले आहे.