बीड जिल्हा क्रॉस कंट्री निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न
बीड प्रतिनिधी : आज शहराजवळील चऱ्हाटा फाटा येथे बीड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन (ॲडव्हॉक कमिटी) च्या वतीने बीड जिल्हा क्रॉस कंट्री निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून सदरील स्पर्धेचे उद्घाटन केले व युवा खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना सांगितले की, आजच्या शिक्षणाच्या स्पर्धेच्या युगात खेळाला मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झाले आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये खेळाडूंसाठी अनेक जागा राखीव असतात. एखाद्या खेळाडूने विशिष्ट स्तरावर खेळ खेळला असेल तर त्याचे 5 गुण ग्राह्य धरून त्यास शासकीय नोकरीत प्राधान्य दिले जाते. त्यासाठी अथक परिश्रम, मेहनत, जिद्द व चिकाटी अंगी असणे आवश्यक आहे. आपण कोणत्याही खेळात तेव्हाच पारंगत होतो जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे त्यासाठी वाहून घेतो. आपण जर राष्ट्रीय खेळाडू पाहिले तर त्यांनी काही वर्षाच्या मेहनतीने ती उंची गाठलेली नसते. त्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच स्वतःला झोकून दिलेले असते. सतत मेहनत, सराव याबरोबरच उत्तम मार्गदर्शन घेतलेले असते व योग्य ते नियोजन केलेले असते. यामुळे आपणही भविष्यातील उत्तम खेळाडू बनण्यासाठी स्वतःला झोकून द्या आणि प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर यश संपादन करा असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी सौ.सुहासिनी देशमुख, खान सबीहा बेगम, बीड जिल्हा तायक्वोंदो असोसिशनचे सचिव डॉ.अविनाश बारगजे, प्रा.डॉ. भागचंद सानप, प्रा.डॉ.शंकर धांडे, प्रा.डॉ. शेटीबा चौगुले, यांच्यासह आयोजक बीड जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन (ॲडव्हॉक कमिटी)चे डॉ.शेख शकील रहीम, दिनेश पवार, सुखदेव माने, उज्वल गायकवाड, मसरुर अन्वर, जब्बार शेख यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.