दुर्जनांना शिरजोर करू नका- अँड. अजित देशमुख
बीड प्रतिनिधी : ग्राम पंचायत निवडणूकीची रणधुमाळी सध्या चालू आहे. वारेमाप खर्च करणारे अनेक उमेदवार आहेत. मतदारांना वाईट वळणाला लावून प्रलोभीत केले जात आहे. या सर्व परिस्थितीत आता मतदारांची जबाबदारी वाढली आहे. मतदान करताना सुज्ञ, जागरूक, निर्व्यसनी आणि जनतेत मिसळून काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. जर दुर्जनांना मतं टाकली तर ते शिरजोर होतील. त्यामुळे मतदार राजाने आता जागे व्हावे. चांगल्या उमेदवारालाचं मतदान करावे, असे आवाहन जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी याबाबत म्हटले होते की, “दुर्जन होतील शिरजोर, आपल्या मताचा मिळता आधार, सर्व जनतेला करतील जर्जर, न देता सत्पात्रे मतदान.” त्यामुळे मतदाराने मतदानाचे दान देताना हे सत्पात्री देणे आवश्यक आहे. दुर्जनाला मतदान केल्यास तो शिरजोर बनतो आणि जनतेला जर्जर करण्यात पाच वर्षे निघून जातात. त्यामुळे विचार करण्याची ही वेळ आहे.
जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. निकोप आणि सदृढ लोकशाहीसाठी विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाचे सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे अवलोकन केले तर स्वराज्याचे स्वप्न भंगल्याचे दिसून येते. त्यामुळे दिवसेंदिवस गरीब आणि श्रीमंतातील दरी वाढत आहे. याला मतदार तेवढाच जबाबदार आहे.
दारू पाजणारे, वाळू उपसणारे, पत्त्यांचे डाव चालविणारे, पैसे वाटणारे हे लोक समाजासाठी घातक असतात. समाजाला हे वेठीस धरतात. त्यामुळे जनतेने यांच्यापासून दूर राहून चांगला व्यक्ती निवडून दिला पाहिजे. आता हीच वेळ आहे, विकास कामाला प्राधान्य देण्याची, गाव विकसित करण्याची. त्यामुळे मतदार जागरुक होणे ही काळाची गरज आहे. चांगले लोक निवडून द्या, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.