बीड ः प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतांना प्रत्येकाने सेवाभाव ठेवला पाहिजे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य ठेवून आम्ही कार्यरत आहोत, यापुढेही कार्यरत राहू असे प्रतिपादन संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.पराग संचेती यांनी केले.
बीड शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये रविवारी आयोजीत मोफ त आरोग्य तपसाणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे शिबीर भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन व रोटरी क्लब ऑफ बीडच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबीर उद्घाटनप्रसंगी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, जितो मराठवाडा चाप्टरचे प्रमोद ओस्तवाल, रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ बीड मिडाटाऊनचे अध्यक्ष सुनिल पारख, सचिव बालाजी घरत, संपादक गंमत भंडारी, डॉ.प्रमोद भिलारे, डॉ.संतोष शिंदे, सुदर्शन शिंदे, विलास बडगे, भारतीय जैन संघटनेचे आशिष जैन, आदेश नहार, किशोर पगारीया, यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.संचेती म्हणाले, पाठदुखी, गुडघेदुखीचा त्रास बहुतांश व्यक्तींना कधी ना कधी होतोच. तो टाळण्यासाठी योग्य आहार, व्यायाम गरजेचा आहे. विशेषतः आपले वजन नियंत्रीत असायला हवे. ते नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य असा आहार घ्यायला हवा. तरीही त्रास झालाच तर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. ऑर्थोपेडीक्सच्या संबंधीत आजार, शस्त्रक्रिया यावर अत्याधुनिक उपचारासाठी आता पुणे येथे संचेती हॉस्पिटलची नवी इमारत उभा राहत आहे. या ठिकाणी रोबोटीक सर्जरीसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध केल्या जाणार आहेत. या ठिकाणी राज्याच्या काना-कोपर्यातून आलेल्या रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी आम्ही बांधील आहोत. विशेषतः सध्या उपचारासाठी येणार्या मोठ्या खर्चामुळे अनेकांसमोर अडचणी निर्माण होतात. या टाळण्यासाठी आम्ही शासनाच्या सर्व योजना या ठिकाणी उपलब्ध करुन देणार आहोत. या योजनांमुळे उपचारासाठी आलेला रुग्ण पैसे नाहीत म्हणून परत जाणार नाही, त्याला योग्य ते उपचार मिळू शकतील असे डॉ.संचेती यांनी सांगितले.
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी रोटरी क्लबचे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा आदर्श इतर संघटनांनाही घ्यायला हवा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रो.राजेंद्र मुनोत यांनी केले तर आभार रोटरीचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास वाय जनार्दन राव, सुरज लाहोटी, अभय कोटेचा, सुमित जैस्वाल, प्रा.कृष्णा खांडे, संदिप खोड, विवेक बडगे, उदय नागरगोजे, रामलाल छाजेड, रामेश्वर कासट, डॉ.विनोद ओस्तवाल, डॉ.प्रमोद शिंदे, डॉ.धनंजय वाघमारे, संतोष टवाणी, दिनेश लोळगे, निलेश जगदाळे, सुधीर अडाणे, रवी उबाळे, अमित पगारीया, सुहास मुनोत, निलेश ललवाणी, सचिन कांकरिया, दिनेश लोळगे, सुर्यकांत महाजन, अतिन डोनगावकर, काला, आदिंची प्रमुख उपस्थिती होती. लाईफ लाईन हॉस्पिटल व संचेती हॉस्पिटलच्या कर्मचार्यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आले रुग्ण
हाडांच्या आजारावरील उपचार, शस्त्रक्रियेसाठी संचेती हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. तेथील डॉक्टर बीडमध्ये शिबीरात तपासणी करणार असल्याची माहिती मिळताच जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून रुग्ण सकाळीच लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. डॉ.संचेती व डॉ.भिलारे यांनीही अतिशय तत्परतेने सकाळी आठ वाजताच रुग्ण तपासणीला सुरुवात केली. दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास पाचशे रुग्णांची तपासणी करुन त्यांना आवश्यक ती औषधे, व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच ज्यांना आवश्यक आहे त्यांच्या शस्त्रक्रिया पुणे येथे संचेती हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत.