बीड । प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली असून कोरोना आकडा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. तरी सुद्धा जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा कमी होताना दिसत नाही. आज जिल्ह्यात तब्बल 299 रुग्ण पॉझीटिव्ह आढळून आले. कोरोना आकडा रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करत ही लढाई जिंकण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी सुचनांचे पालन नाही केले तर जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जावू शकते.
आज दुपारी आरोग्य विभागाकडून 2056 अहवालाचा रिपोर्ट प्राप्त झाला. यात 1757 रिपोर्ट निगेटिव्ह आले तर 299 पॉझीटिव्ह आले. यात बीड-104, अंबाजोगाई-80, आष्टी-15, केज-30, गेवराई-16, धारूर-4, माजलगाव-19, परळी-14, पाटोदा-7, वडवणी-6, शिरूर-4 असे एकूण जिल्हाभरात रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात उद्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यासह इतर नियम लागू करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन यापुढे नागरिकांना करावेच लागेल.