नियुक्तीच्या ठिकाणी शिक्षक गैरहजर राहात असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई होईना
बीड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चकलांबा शाळेवरती शिक्षक येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेमध्येच भरवली शाळा
चकलांबा शाळेवर गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर आमदाराचा वरदहस्त
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : डिजिटल युगामध्ये जशा इतर बाबीमध्ये बदल झाला आहे तसेच शिक्षणप्रणालीमध्ये सुद्धा मोठे बदल होत असून प्रत्येक पालक व विद्यार्थ्यांना अपडेट शिक्षण देण्यासाठी धडपड करत असतो. यामुळेच बीड जिल्ह्यात इंग्रजी शाळांचे फॅड आले असून प्रत्येकजण इंग्रजी शाळांकडे जात असल्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर दुसरीकडे ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये 900 च्या पुढे पटसंख्या आहे त्या शाळांमध्ये शिक्षक गैरहजर राहात असल्यामुळे आज चक्क चकलांबा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणविभागातच शाळा भरवली. गेल्या दहा वर्षांपासून या शाळेला शिक्षकांची कमतरता असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून वारंवार याकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी काही शिक्षक नियुक्त असूनसुद्धा ते फक्त सहीसाठी शाळेत जात असल्याचे माहिती समोर येत असून त्या शिक्षकांवर संबंधित आमदाराचा वरदहस्त असल्याची चर्चा सुद्धा होत आहे. सध्या शिक्षण विभागाचा कारभार शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे पाहात असून त्यांच्या कार्यकाळात मात्र त्यांचा या विभागात दबदबा राहिलेला नाही यामुळे शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू आहे. शिक्षणाधिकारी साहेब कामकाज जमत नसेल तर खुर्ची खाली करा अशी मागणी सुद्धा आता दबक्या आवाजात होत आहे.
बीड जिल्हा मुळात हा विकासापासून कोसोदूर असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य वर्ग जास्त असून उच्च शिक्षण घेण्यासाठी पाल्यांना जो खर्च होतो तो खर्च पेलण्याची जबाबदारी अनेक पालकांची नसल्यामुळे तो पालकवर्ग आपले पाल्य जिल्हा परिषद शाळेत शिकवतो परंतु येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे त्या विद्यार्थ्यांचे सर्वसोयी सुविधा असूनसुद्धा प्रचंड नुकसान होत आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील जि.प.शाळेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक नसल्याची समस्या आहे. विशेष म्हणजे ही शाळा बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा म्हणून गणली जाते. या शाळेत 900 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी काही शिक्षक रिक्त आहेत तर काही फक्त सह्या करण्यासाठी येत असल्याच्या तक्रारी आहेत. वारंवार शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी आज चक्क शिक्षण विभागाच्या दालनासमोरच शाळा भरवली. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षण मिळालेच पाहिजे, आमच्या मागण्या पूर्ण करा असे फलक हातात घेतले होते.