एक दिवस भारताचे नेतृत्व गेवराईचा खेळाडू करेल-रणवीर पंडित; गेवराईत रंगलाय कब्बडीचा महासंग्राम
गेवराई प्रतिनिधी : जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रणवीर पंडित यांनी क्रिडा महोत्सव आयोजित केल्यामुळे गेवराई तालुक्यात खेळाचे अविस्मरणीय वातावरण तयार झाले आहे. यातून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना क्रिडा क्षेत्रात नाव करण्याची मोठी संधी मिळाली आहे असे प्रतिपादन गेवराईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांनी केले तर एक दिवस गेवराईच्या मातीत घडलेला खेळाडू भारताचे नेतृत्व करेल असा विश्वास शारदा अकॅडमीचे संचालक रणवीर पंडित यांनी व्यक्त केला. क्रिडा महोत्सवात चौथ्या दिवशी गेवराईत आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेचा शुभारंभ करताना ते बोलत होते
जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने क्रिडा महोत्सवात आज चौथ्या दिवशी गेवराई शहरातील शारदा विद्या मंदिरच्या मैदानावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा शुभारंभाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, जयभवानी कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, नगरसेवक श्याम येवले, डॉ.सर्वोत्तम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार वाव्हळ, रिपाइंचे किशोर कांडेकर, दिनेश घोडके, ॲड.अशोक शिंदे, अनिल घोडके, शारदा प्रतिष्ठान संघाचे माजी खेळाडू प्रदिप उदे यांच्यासह स्पर्धेचे संकल्पक शारदा अकॅडमीचे संचालक रणवीर पंडित व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना किशोर कांडेकर म्हणाले की, माजीमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांनी गेवराई तालुक्यात शैक्षणिक जाळे निर्माण केले. पुढे अमरसिंह पंडित यांनी शारदा महोत्सवाच्या माध्यमातून राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले. त्यामुळे चांगले खेळाडू गेवराईत आले. त्याची प्रेरणा घेऊन गेवराई तालुक्यात खेळाचे वातावरण पुढे नेण्यासाठी रणवीर पंडित यांनी हे क्रिडा चळवळीचे मोठे काम हाती घेतले आहे. या खेळाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होऊ महाराष्ट्राच्या नकाशावर गेवराई तालुका गाजत राहिल.
आपल्या भाषणात संदीप काळे म्हणाले की, जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रणवीर भैय्या यांनी तालुक्यात खेळाचे जे वातावरण तयार केले आहे ते अविस्मरणीय आहे. खेळाला जिवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जी माणसे खिलाडू प्रवृत्तीचे असतात ते कधीच आत्महत्येकडे वळत नाहीत, कारण हार जित पचवण्याची ताकद त्यांच्यात असते. अशा खिलाडू माणसांना आणि विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे काम शिवाजीराव पंडित परिवाराने आज तागायत केले आहे आणि आता त्यांची दुसरी पिढी रणवीर पंडित यांच्या माध्यमातून हे काम पुढे नेत आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये मोठी क्षमता असते, या क्षमता ओळखा आणि त्यापद्धतीने खेळा. जयभवानी आणि जगदंबा संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रणवीर पंडित आपल्या भाषणात म्हणाले की, परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतर क्रिडा क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात खेळाचे वातावरण तयार व्हावे अशी आदरणीय दादा आणि भैय्यासाहेबांची ईच्छा होती. त्यासाठी क्रिडाक्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने केले आहे. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी जबाबदारी स्विकारुन मैदान गाजवल्या बद्दल मला विशेष कौतुक आहे. प्रो कब्बडी मध्ये खेळणारा आदित्य शिंदे हा खेळाडू आपला आहे, या मातीत घडलेला आहे. एक दिवस भारताचे नेतृत्व करणारा खेळाडू आपल्या तालुक्यातील असेल आसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शारदा विद्या मंदिर येथे या कब्बडी स्पर्धा होत असून स्पर्धेत संस्थेतील आठरा मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. दोन मैदानावर हे सामने होत आहेत. खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित क्रिडाप्रेमी, विद्यार्थी, क्रिडा शिक्षक जल्लोष करत असून शारदाचे मैदान दणाणून गेले आहे. मुलींच्या संघात चुरशीचे सामने होत असून पंच म्हणून शुभम कादे, गणेश यादव, शंतनु शिंदे, बाळु आडे, ज्ञानेश्वर धापसे, पवन खांडे, विष्णुपंत घोंगडे तर गुणलेखक म्हणून आदित्य शिंदे काम पाहत आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारदा ॲकॅडमीचे प्रशिक्षक डॉ. केतन गायकवाड यांच्यासह विजय अपसिंगेकर, विजय जाहेर आणि क्रिडा शिक्षक परिश्रम घेत आहेत.
प्रारंभी विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते क्रिडा ध्वजारोहण आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र यांनी केले तर संचलन दादाराव काकडे यांनी केले. शारदा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे आणि त्यांचे सहकारी स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत. यावेळी जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयातील कब्बडी संघ, त्यांचे प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.