जय भवानीच्या क्रिडा महोत्सवाचा थाटात शुभारंभ
गेवराई प्रतिनिधी: क्रीडा क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात करिअर करावे या उद्देशाने जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेकडून क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मनापासून खेळा, खेळाची रुची कायम ठेवा. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात गेवराईची नवी ओळख निर्माण करतील असा विश्वास शारदा अकॅडमीचे संचालक रणवीर पंडित यांनी व्यक्त केला. क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित क्रिडामहोत्सवाचा रविवार दि. ४ डिसेंबर रोजी शिवाजीनगर येथील जयभवानी विद्यालयात थाटात शुभारंभ करण्यात आला. यावेळी शारदा अकॅडमीचे संचालक रणवीर अमरसिंह पंडित, जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, सरपंच अंकुश गायकवाड, रमेश नेहरकर, रामदास मुंडे, विष्णुपंत घोंगडे, पाराजी मोटे, मंगेश कांबळे, अशोक नाइकवाडे, जय भवानी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, शिवशारदा मल्टिस्टेटचे मॅनेजर रणजित पंडित, शिवशारदा सुझुकीचे व्यवस्थापक सुनिल कलंत्री, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर ससाने, प्रभाकर कांबळे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, प्रा. काशिनाथ गोगुले यांच्यासह जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, क्रिडा शिक्षक, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना रणवीर अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे क्रिडा गुण विकसित करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी संस्थेच्या वतीने भव्य दिव्य मैदाने तयार केली आली आहेत. क्रिडा शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. खेळाडूंना स्पोर्ट शुज व ड्रेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त करुन जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय शिवाजीराव दादा पंडित, संस्था अध्यक्ष अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित आणि माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली होणा-या या क्रिडा महोत्सवातून गेवराई तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण होतील, खेळाच्या क्षेत्रात गेवराईची नविन ओळख निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात दत्तात्रय टेकाळे यांनीही मनोगत व्यक्त करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, ध्वजारोहण आणि मैदान पुजन करुन क्रिडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या पहिल्या दिवशी शिवाजीनगर येथील जयभवानी विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर चार मैदाने तयार करण्यात आली आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर माध्यमिक विद्यालय उमापुर विरुद्ध माध्यमिक विद्यालय भेंडटाकळी, माध्यमिक विद्यालय पारगाव विरुद्ध यांच्यामध्ये शिव शारदा पब्लिक स्कूल यांच्यामध्ये मुलांच्या गटातील शुभारंभाचे सामने झाले. स्पर्धेमध्ये मुलींनी उत्कृष्ट खो-खो खेळ करून उपस्थित क्रिडा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या स्पर्धेत संस्थेच्या सर्व विद्यालयातील संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू बापुसाहेब तारुकर, विष्णुपंत घोंगडे, तुकाराम करांडे आणि राज्य खेळाडे अमित फुलारे, सुरेश गरड, नवनाथ चव्हाण, राजू काशिद, सुनिल भोले, भारत यादव, अक्षय प्रधान, विजय अपसिंगेकर, देविदास गिरी, गणपत डोंगरे, जाकुराम जाधव, गणेश नवले, सुदाम गुंजाळ, अंगद पघळ यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयभवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत राठोड, पर्यवेक्षक गायकवाड के एन, उपमुख्याध्यापक रणजित सानप यांच्यासह जयभवानी विद्यालयाचे सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत. यावेळी जयभवानी व जगदंबा शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, खेळाडू, क्रिडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.