बालेकिल्यातील कलाकारांची ताकद एकवटली
बीड प्रतिनिधी :- कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा अभाव पडत गेल्याने बीडमध्ये सांस्कृतिक चळवळ थंडवल्याचे दिसून येत होते. गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये बाल कलाकारांसाठी देखील कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत नव्हते. या सर्व बाबींचा सखोल विचार करत बीड कलावंतांनी एकत्रित येऊन बालकलावंतांच्या अंगी सुप्त अवस्थेत दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय सात दिवसीय चंपावती महोत्सव डॉ सौ दिपाताई भारतभूषण क्षीरसागर करंडकाचे भव्य-दिव्य आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या मुखपृष्ठाचे विमोचन दि. 1 डिसेंबर रोजी आदरणीय डॉ सारिकाताई क्षीरसागर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील नवं बालकलावंतांना रंगमंचावर संधी उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने बीड कलावंतांनी एकत्रित येऊन आपली वज्रमुठ बांधली आहे. यामुळे नक्कीच बीडच्या थंडावलेल्या संस्कृतीक चळवळीला नवसंजीवनी मिळणार असून आगामी काळात कलाकारांचा बालेकिल्ला असणाऱ्या बीडमध्ये प्रतिभावंत कलाकारांची सुसंस्कृत पिढी घडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. बीड रंगभूमीवर धडपडणाऱ्या कलाकारांना सातत्याने सन्मान देत त्यांच्या सहकार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बीडच्या अध्यक्षा आणि बालरंगभूमी परिषद शाखा बीडच्या अध्यक्षा आदरणीय डॉ दीपा क्षीरसागर यांच्या नावे बीडमध्ये चंपावती महोत्सव नामक एक मोठी सांस्कृतिक चळवळ उभारल्या जात असल्याचे समाधान वाटते आहे असे मत डॉ सारिकाताई क्षीरसागर यांनी व्यक्त करत बीड कलाकारांना चंपवती महोत्सच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. बीड कलाकारांनी डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांचा हृदय सत्कार करून चंपवती महोत्सवाची रूपरेषा समजावून सांगत लवकरच या कार्यक्रमाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नृत्यांगण डान्स क्लासेसच्या संचालिका शितल कांबळे, डॉ कविता गुंडपाटील, शांताई इव्हेंटचे संचालक अमोल गायकवाड, ऋषिकेश गिराम पाटील, अभिषेक दळवी, निलेश लोंढे, सागर माडेकर, कबीर जाधव, राजेश लोंढे, प्रतिक कांबळे उपस्थित होते.