फोटोशेषनची नौटंकी करून आमदाराने हसू करून घेतले
बीड, प्रतिनिधी :- जुना मोंढा भागात सिमेंट रोडवरील फायनल लेअरचे काम सुरू करण्यात आले आहे. दहा दिवसांपासून सुरु असलेल्या या कामाच्या अटी आणि शर्तींमध्ये पेवर लेवल मशीनचा वापर करणे अनिवार्य असताना बीडच्या आमदार महोदयांनी आज (दि.2) सकाळी सदरील कामाच्या ठिकाणी येऊन नेहमीच्या सवयीप्रमाणे आयत्या नैवद्यावर चोचा मारून फोटोशेषणची नौटंकी केली. काम जयदत्त अण्णांनी मंजूर करून आणले, मोंढ्यातील व्यापारी बांधव, डॉ. योगेश क्षीरसागर व बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांच्या उपस्थितीत आम्ही रस्त्यावर उभे राहून काम सुरू केले. आज आमदारांनी तिथे येऊन स्वतःचे हसे करून घेतले, अशी बोचरी टीका गटनेते फारुख पटेल व नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केली आहे.
या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात फारुख पटेल व अमर नाईकवाडे यांनी म्हटले आहे, नगरोत्थान योजनेची 70 कोटींची सिमेंट रस्त्याची कामे माजी मंत्री जयदत्त अण्णांच्या विशेष मागणीवरून राज्य शासनाने मंजुर केली होती. सदरील काम हे कमी वेळेत व गुणवत्तापूर्वक कसे होईल यासाठी गेल्या काही दिवसांपासून आम्ही व आमचे सहकारी प्रयत्नशील आहोत. याचे साक्षीदार त्या भागातील नागरिक व व्यापारी बांधव आहेत. मोंढा भागात सुरू असलेल्या दर्जेदार सिमेंट रस्ता कामाच्या अंतिम लेअरचे काम आज सुरू करण्यात आले. यासाठी सकाळीच पेवर लेव्हलिंग मशीन आली होती. विशेष म्हणजे सदरील कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी निविदेच्या अटी आणि शर्तींमध्ये पेवर लेवल मशीन चा वापर अनिवार्य करण्याच्या सूचना आम्ही मुख्याधिकारी ढाकणे यांना दिल्या होत्या. त्यानंतरच टेंडर मध्ये पेवर लेवल मशीन अनिवार्य असल्याची अट मुख्याधिकाऱ्यांनी घातली होती. त्यामुळे आज पेवर लेवल मशीन द्वारे सदरील कामे सुरू झाली. सिमेंट रस्त्याचे काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ठरलेल्या नियोजनाप्रमाणे होत असतानाही नेहमीप्रमाणे अज्ञानी बालिश आमदार महोदयांनी कामाच्या ठिकाणी येऊन फोटोशेषण करत आयत्या नैवदावर चोचा मारून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार पेवर लेवल मशीनचा वापर करण्यात आल्याचे आमदार महाशयांनी आपल्या फेसबुक पोस्टवर सांगितले. या प्रकाराने नेहमीप्रमाणे बालिश आमदार महोदयांनी आपले हसू करून घेतले असल्याची खरमरीत टीका अमर नाईकवाडे यांनी केली आहे.
तसेच सदरील रस्ता काम सुरू असल्यामुळे व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे नम्र आवाहन अमर नाईकवाडे यांनी केले आहे.
लवकरच आमदाराच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणार-अमर नाईकवाडे
स्वतःला बीड शहरात साधी शंभर फुटांची गटार बांधता आली नाही, दुसऱ्याने आणलेल्या कामाचं फुकट श्रेय घेणाऱ्या आमदार महोदयांच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल आम्ही लवकरच करणार आहोत.