चेअरमन अमरसिंह पंडित यांची माहिती: २३०० रू. प्रमाणे पहिला हप्ता बँक खात्यात जमा
गेवराई प्रतिनिधी – प्रतीदिन अडीच हजारहून पाच हजार मे.टन ऊस गाळप क्षमता वाढविल्यानंतर पूर्ण क्षमतेने जय भवानीकडून ऊसाचे दैनंदिन गाळप होत आहे. गुरुवार, दि.०१ डिसेंबर रोजी जय भवानीने २२ दिवसांत एक लाख मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप केले. कारखान्याकडून २३०० रु. पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला असून नोंद केलेल्या व बिगर नोंद केलेल्या सर्व ऊसाचे जय भवानी गाळप करणार असल्याची माहिती चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली. यावेळी त्यांनी सभासद, संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी, वाहतुक ठेकेदार यांसह संबंधितांचे आभार व्यक्त केले.
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ केल्यानंतर कारखान्याची नविन अत्याधुनिक यंत्र सामुग्री पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. कारखान्याच्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक बदल करण्यात आल्यामुळे कारखाना गाळप क्षमतेप्रमाणे कार्यरत आहे. केवळ २२ दिवसांत एक लाख मे. टन ऊसाचे गाळप करून जय भवानीने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढून नविन इतिहास रचला आहे. मराठवडयातील सर्वाधिक दैनंदिन गाळप करणारा म्हणून जय भवानीची नवी ओळख या निमित्ताने झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या पंधरवाड्याचे ऊस देयक अदा करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २३०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. कारखान्याच्या अत्याधुनिकीकरणामध्ये कर्मचारी आणि कामगार यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे यावेळी चेअरमन अमरसिंह पंडित यांनी आवर्जून सांगितले. अतिशय कमी वेळेत दर्जेदार काम कामगारांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर योग्य भाव मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुरुवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी कारखान्याने एक लाख मे.टन ऊसाचे यशस्वी गाळप पूर्ण करताच कारखान्यातील कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. कारखान्याचे जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, चिफ इंजिनियर अशोक होके, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, कामगार कल्याण अधिकारी संदिप भोसले, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, डिस्टीलरी इंचार्ज राजेंद्र बढे, डे. चिफ इंजिनियर ऋषिकेश देशमुख, परचेस अधिकारी सुशांत साळुंके, इडीपी मॅनेजर धनाजी भोसले, ऊस पुरवठा अधिकारी सुदाम पघळ व विच्छिष्ट कुटे, कामगार प्रतिनिधी जगन्नाथ दिवान यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी या आनंदात सहभागी होवून सर्वांना शुभेच्छा दिल्या. कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, माजी चेअरमन जयसिंग पंडित व सर्व संचालकांनी यावेळी सभासद, संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी, वाहतुक ठेकेदार यांसह संबंधितांचे आभार व्यक्त केले.