बीड/प्रतिनिधी :पोलिसांना २४ तास जनतेच्या रक्षणासाठी तैनात रहावे लागते. यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष हाेते. यानुषंगाने २८ नोव्हेंबरपासून पोलिसांच्या आरोग्य तपासणीस सुरुवात झाली. तीन दिवस हा उपक्रम राबविला जाणार आहे.
पोलिस अधिकारी व अंमलदारांना कामाचा अतिरिक्त ताण, अवेळी जेवण यामुळे आरोग्याच्या समस्यांची भीती असते.सततच्या ताणतणावामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचे नियोजन केले. २८ रोजीपासून शिबिराला सुरुवात झाली . पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, मानव संसाधनचे पो.नि.संतोष पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात शिबिराला भेट दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे व वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन आंधळकर उपस्थित होते. पोलीस ठाण्याजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण , उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा मोफत असणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.