सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्याचा या धंद्यात सहभाग; अन्नभेसळ अधिकारी फक्त वसूलीसाठीच का?
–जिल्ह्यात सर्वत्र गुटखाच गुटखा; छोट्या मोट्या टपरी, किराणा दुकानात होतेय विक्री
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना सुद्धा जिल्ह्यात मात्र इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या टपरीवर, किराणा दुकानात, चहाच्या हॉटेल मध्ये खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यामुळे येथील युवा पिढी गुटख्याच्या आहारी जात आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटख्याचे व्यसन लागले आहे. आती गुटख्याच्या व्यसनामुळे युवा पिढीला विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा येतोच कसा? अन्नभेसळ विभाग नेमका करतोय तरी काय? अन्नभेसळ अधिकारी फक्त वसुलीसाठी आहेत का? यासह इतर चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यात गुटख्याचा गैरमार्गाने व्यवसाय करणारा सत्ताधारी पक्षातील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही का? सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होत असताना सर्व यंत्रणा गप्प का? संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे मात्र जिल्ह्यातील युवा पिढी गुटख्याच्या आहारी जात आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. हा गुटखा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातुन व इतर राज्यातून वाहनांने येत आहे. गुटख्याचा गैरमार्गाने धंदा करणाऱ्यांचे ठिक-ठिकाणी चांगले संबंधित असल्यामुळे हा गुटखा जिल्ह्यात सहज येतो. विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठ्या ट्रकने गुटखा येऊ लागला आहे. बीड तालुक्यातील विविध ठिकाणी हा गुटखा स्टोक केल्या जातो, तेथून छोट्या वाहनांनी तो गुटखा जिल्ह्यातील विविध भागात पोहोच होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या टपरीवर गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यासह चहाचे हॉटेल, किराणा दुकाने याठिकाणी सुद्धा गुटखा विक्री मोठ्या जोमात सुरु असून यासर्व प्रकाराकडे अन्नभेसळ विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यामुळे मात्र जिल्ह्यातील युवा पिढीचे आयुष्य बर्बाद होऊ लागले आहे. यामुळे संबंधित यंत्रणेने जिल्ह्यात होणारी गुटखा विक्री बंद करुन गुटखा माफियांना धडा शिकवावा अशी मागणी होत आहे.
अन्नभेसळ अधिकारी यांना त्यांच्या कामाचाच विसर
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असून याकडे मात्र अन्नभेसळ अधिकारी जाणिव पुर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अन्नभेसळ अधिकारी यांच्या कामकाजावरुन त्यांना त्यांच्याच पदाचा विसर पडल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हाधिकारी साहेब आपणच त्यांच्या त्यांच्या पदाची जाणिव करुन द्यावी जेणेकरुन जिल्ह्यात सुरु असलेली अवैद्य गुटखा विक्री बंद होण्यास मदत मिळेल.