बीड प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ बीडचे सामाजिक कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. आरोग्य, शिक्षण याबरोबरच वंचित, उपेक्षितांसाठी अविरत उपक्रम राबवणार्या रोटरीने कारागृहातील कैद्यांना थंडीमध्ये उपयोगी पडतील अशा ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आज आयोजीत केला. या माध्यमातून रोटरीने कैद्यांना आपुलकीची ऊब दिल्याचे प्रतिपादन पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी केले.
बीड येथील जिल्हा कारागृहात गुरुवारी रोटरी क्लब ऑफ बीड व जिल्हा परिषदेच्या कामगार व कर्मचारी कल्याण निधीच्या माध्यमातून तीनशे कैद्यांसाठी उत्तम दर्जाचे ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधिक्षक विलास भोईटे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांनी केले. यावेळी त्यांनी रोटरीने राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत माहिती देत यापुढेही हा सेवायज्ञ सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, डॉ.विक्रम सारुक, जिल्हापरिषद सदस्य अॅड.प्रकाश कवठेकर, विद्युत निरीक्षक गणेश सोळंके, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना उत्तम पाटील यांनी हातून झालेल्या चुकीमुळे तुम्ही इथे आला आहात. परंतु तो आता भूतकाळ झाला असून वर्तमानात चांगले काम करुन तुम्ही तुमचे भविष्य उज्वल करु शकता असे म्हटले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे यांनी कवितांची गुंफ ण करत मार्गदर्शन केले. कारागृह अधिक्षक विलास भोईटे यांनी रोटरी क्लब व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कैद्यांसाठी चांगले उपक्रम राबविले जात असल्याबद्दल आभार मानले. यापूर्वी रोटरीने जलशुद्धीकरण यंत्रणा व पुस्तके उपलब्ध करुन दिली होती. आता ऐन कडाक्याच्या थंडीत ब्लँकेट उपलब्ध करुन दिले. यातून रोटरीने सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात कैद्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास वाय.जनार्धन राव, सुरज लाहोटी, अभय कोटेचा , संतोष पवार , विवेक बडगे, संकेत कदम,प्रोजेक्ट चेअरमन संदिप खोड,गणेश साळुंके, रवींद्र हसेगावकर, प्रशांत पवळ, उद्योजक सुनिल माने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र मुनोत यांनी केले तर आभार उदय नागरगोजे यांनी मानले.
पाल्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवणारःदिलीप जगदाळे
कारागृहात असलेल्या कैद्यांच्या पाल्यांना शैक्षणिक कागदपत्रासंबंधीत अडचणी येत असतील तर त्याविषयी कारागृह अधिक्षकांकडे माहिती द्या, ते आम्हाला कळवतील. शैक्षणिक कागदपत्रे, शिष्यवृत्ती, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र यासारख्या अडचणी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील असू दे त्या सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष दिलीप जगदाळे यांनी दिले.