जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळाले 410 कोटी..!
बीड प्रतिनिधी : जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. प्रचंड पावसामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आले. अनेक ठिकाणी पिके तरंगली. अस्मानी संकटामुळे माप पदरात पडण्यापूर्वीच कापसासारख्या नगदी पिकला फटका बसला. जिल्ह्यातील हवालदिन झालेल्या शेतकऱ्यांना 410 कोटी रुपयांचे अनुदान देऊन सरकारने समर्थपणे मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे शिंदे – फडणवीस सरकार शेतकर्यांचे कैवारी आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट दरम्यान पावसाने ताणल्यामुळे पिकांचा जोम कमी झाला. तर सप्टेंबर – ऑक्टोबरच्या अतिवृष्टीने तडाखा दिला. जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने कापूस, तूर, उडीद, सोयाबीन, मुग आदि पिकांचे नुकसान झाले. नगदी पिकाला बसलेल्या फटक्यामुळे शेतकर्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले. अस्मानी संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवांना मदतीची गरज निर्माण झाली. पालकमंत्री ना. अतुलजी सावे, लोकनेत्या पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अतिवृष्टी ग्रस्त भागात थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचा लेखाजोखा शासनापुढे मांडला. राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत देऊन शेतकऱ्यांचे हित साधले आहे. शिवाय पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तातडीने शासनाची मदत देण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्याना सूचना केल्या. जिल्हास्तरीय समितीने तातडीने बैठक घेऊन, सोळा प्रस्तावापैकी अकरा प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र केले असून, या अकरा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रति शेतकरी एक लाख रुपयाची मदत राज्यसरकार मार्फत दिली जाणार आहे. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार सर्वसामान्य जनतेसाठी संवेदनशील वृत्तीने काम करणारे गतिमान सरकार म्हणून ओळख निर्माण झाली आहे.