चिंता करु नका उस शिल्लक राहणार नाही —अमरसिंह पंडित
जयभवानीच्या ४० व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ संपन्न
गेवराई प्रतिनिधी : या कारखान्याच्या नावात ‘ जय ‘ आहे आणि त्याला ‘ भवानी ‘ मातेचा आशिर्वाद आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अमरसिंह पंडित यांनी या जयभवानी सहकारी साखर कारखान्याची कार्यक्षमता वाढवली असून आता जयभवानी कारखाना उज्वल वाटचाल करणार आहे. यापुढे ही हवामान चांगले राहणार असून पाऊसकाळ उत्तम राहणार आहे. हवामानाचा अभ्यासपूर्वक अंदाज देऊन यापुढेही मी सुद्धा शेतकऱ्यांचे काडीचेही नुकसान होऊ देणार नाही असे प्रतिपादन सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले तर अत्याधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानामुळे आता जयभवानीची कार्यक्षमता वाढली असून साडे नऊ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. संगणकीय प्रणाली द्वारे उसाच्या नोंदी करण्यात आल्या असून कुणाचाही उस शिल्लक राहणार नाही, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे प्रतिपादन जय भवानी कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या चाळीसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख आणि कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी करुन कारखान्याच्या तांत्रिक बाजूची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ऊस वाहतूक केल्याबद्दल बैलगाडी मालक हरिभाऊ नाईकवाडे मिनी ट्रॅक्टर चालक अशोक जाधव, मोठे ट्रॅक्टर चालक विजय गुंजाळ यांचा कारखान्याच्या वतीने पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला तसेच कारखान्यातील तांत्रिक काम कमी वेळात पूर्ण केल्याबद्दल कारखान्याच्या वतीने अभियंता विभागाचे नरेंद्र देशमुख व सुरज बिचके यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की अत्याधुनिक पद्धतीची मशिनरी बसवल्यामुळे जय भवानी कारखाना नव्याने रंगा रुपात आलेला आहे त्यामुळे गाळपक्षमता वाढली असून या हंगामात साडेनऊ लाख मॅट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखाना कर्जमुक्तीच्या दृष्टीने वाटचाल करत असून येणारा काळ सर्वांसाठी खूप चांगला आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. कारखान्याच्या उत्कर्षात राजकारण आणू नका असे आवाहन करून यापुढे कसलेही राजकारण न करता संगणकीय प्रणाली प्रणाली द्वारे उसाच्या नोंदणी झाल्या असून सर्वांचा ऊस गाळप केला जाणार आहे. साखरेबरोबरच उपपदार्थाचेही उत्पादन करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्तीचा भाव देण्यासाठी कारखाना तयार आहे असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अभ्यासपूर्ण पद्धतीने मार्गदर्शन करून हवामानाचे अंदाज दर्शविले. पाऊस येणार की नाही हे कसे ओळखावे याचे नैसर्गिक दाखले त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. ज्या कारखान्याच्या नावातच जय आहे आणि त्याला भवानी मातेचा आशीर्वाद आहे आणि अभ्यासू अमरसिंह पंडित यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आहे, त्या कारखान्याची वाटचाल उज्वल आहे असेही ते यावेळी म्हणाले.
आपल्या आशीर्वाद पर भाषणात बोलताना ह. भ. प. शिवाजी महाराज म्हणाले की माजी मंत्री शिवाजीराव दादांनी जय भवानी कारखाना उभा केला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अमरसिंह पंडित आणि जयसिंग पंडित कारखान्याची धुरा सक्षम सांभाळत आहेत असे सांगून सर्वांची सेवा करण्यासाठी हा कारखाना उभा केला असून सर्व शेतकरी बांधवांनी कारखान्यांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जय भवानी कारखान्याचे सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, ठेकेदार, वाहनमालक, चालक, कामगार, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.