बांधावर जाऊन पंचनामे करा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी
बीड प्रतिनिधी – परतीच्या पावसाने बीड मतदार संघातील अनेक शेतकरी बांधवांचा जीव गेला, हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अमाप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देऊन त्यांना हातभार द्या अशी आग्रही मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.३१) जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केली. यावेळी आ.क्षीरसागर यांनी मतदारसंघातील शेती, विद्युत पुरवठा, रस्ते आदी सर्व अति महत्वाचे प्रश्न मांडले.
सोमवारी दुपारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीस बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे उपस्थित होते. यावेळी आ.क्षीरसागर यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडले. विमा कंपनीचे अधिकारी बांधावर गेले नाहीत, पंचनामे केले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना पीकविमाच्या अटीशर्तीच्या मुद्यावरून नाहक वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या विमाकंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आ.क्षीरसागर यांनी केली. जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळात २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना काढावी. सर्वत्र थैमान घालणाऱ्या लम्पी रोगावरील लस प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून द्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा,अग्रीम, सततच्या पावसामुळे झालेले नुकसानीचे अनुदान लवकर मिळावे. डॉ.पंजाबराव देशमुख व्याज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना आदेशीत करावे. चुकीची आकडेवारी दाखवणारे पर्जन्य मापक यंत्र बदलून नवीन बसविण्यात यावे अशा आग्रही मागण्या आ. क्षीरसागर यांनी केल्या.
अंजनवती,पाली सबस्टेशनचे काम त्वरित सुरु करा
बीड तालुक्यातील अंजनवती व पाली येथे मंजूर असलेले सब स्टेशनचे काम प्रत्यक्ष चालू करण्यात यावे. याच मोठा फायदा परिसराला होणार आहे. तसेच, विद्युत विभागाला बील भरणातील 33% प्रमाणे बीड शहर, बीड ग्रामीण शिरूर ग्रामीण शेतकऱ्यांना, नागरिकांना 25/63/100 चे रोहित्र देण्यात यावे व याविषयातील कामे करण्यात यावी. बीड शहरातून जाणारा मुख्य १२ किमीच्या रस्त्यावरील महावितरण कंपनीने पोलशिफ्टिंग करून देण्यात यावे आणि रस्त्याच्या दोन्हीही बाजूने नाली बांधकाम करण्याची मागणी आ. क्षीरसागर यांनी केली.
डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, नारायण गड तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची मागणी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या व सुशोभिकरण करण्याच्या कामाला गती मिळावी. यामध्ये नगर पालिकेने आराखडा तयार करण्याची निविदा काढावी, यासाठी लागणाऱ्या निधीची तरतुद करावी. तसेच, कै.अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा पंचायत समिती आवारात बसविण्याची पुनश्चः मागणी आ. क्षीरसागर यांनी केली. नाळवंडी नाका ते चिंचोली माळी पासून नाळवंडी पर्यंत रस्ता कामाला गती मिळावी व रहदारी योग्य होण्यासाठी दर्जोन्नती करावी. अतिवृष्टी मुळे शिरूर कासार तालुक्यातील भानकवाडी साळुंके वस्ती येथे पुल नसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी नदीवरील नवीन पुलाला तात्काळ मंजुरी द्यावी. जिल्हाची धाकटी पंढरी नारायणगडच्या विकास कामासाठी मंजूर असलेला उर्वरित 23 कोटी रुपयांचा निधी तत्काळ मिळावा. बीड शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मंदिरास प्रादेशिक प्रयत्न स्थळाच्या कृती आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा व विकास कामासाठी निधी देण्यात यावा अशा विविध लोकोपयोगी मागण्या करून त्यांच्या पूर्ततेसाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आग्रह धरला.