-आमदार ताई सत्ता तुमचीच आहे प्रलंबित कामे मार्गी लावा व श्रेय घ्या!
-काही महिन्यापुर्वी आ.विनायक मेटे यांनी भुमीपुजन केलेल्या रस्त्याचे परत आ.तार्इंनी भुमीपूजन केले
-जनता आता हुशार झाली आहे त्यांना समजते कोणती कामे कोणी आणली आहेत ते
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या काही वर्षापासून राजकारण वेगळ्याच वळणावर जात आहे. श्रेय घेण्यासाठी राजकीय नेते काहीही करायला तयार असतात याची अनेक उदाहरणे समोर आहेत. गेल्या काही महिन्यापुर्वी बीड-इमामपुर-नेकनूर-अंबिलवडगाव-पोथरा-चांदणी ते राज्य मार्ग 64 रस्त्याचे 12 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन स्व.आ.विनायक मेटे यांनी केले होते. त्याच कामाचे भुमीपूजन आज (ता. 31) केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी केले. एकाच कामाचे दोन दोन वेळेस भुमीपूजन होत असेल तर ही बाब चिंताजनक आहे. आमदार ताई अजून सुद्धा अनेक कामे प्रलंबित आहेत ती पहिले मार्गी लावा नंतर श्रेय घ्या असे मत शिवसंग्रामचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
बीड-इमामपुर-नेकनूर-अंबिलवडगाव-पोथरा या रस्त्यासाठी 2018 पासून आ. विनायक मेटे यांनी पत्रव्यवहार करुन या रस्त्यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला होता. याकामाचे भुमीपूजन सुद्धा आ.विनायक मेटे यांनी केले होते. हा रस्ता होत असल्यामुळे अनेकांचा याचा फायदा होणार आहे. याचेच श्रेय घेण्याचा पुर्वी सुद्धा प्रयत्न झालेला आहे. आज परत ते होत आहे. केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आज ईमामपुर-नेकनूर ते पालसिंगन रस्त्याचे भुमीपुजन केले आहे. एकाच कामाचे भुमीपुजन दोन वेळेस होत असेल तर ही बाब गंभीर आहे. ताई आपण जर या रस्त्यासाठी निधी आणला होता तर त्याच वेळेस आपण का बोलला नाहीत?, आज मेटे साहेब जाऊन दोन महिने सुद्धा झाले नाहीत तर आपण परत याच रस्त्याचे भुमीपूजन करत आहात असा सवाल शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित करत आहेत. सध्या सुरु असलेल्या श्रेयवादामुळे अनेक कामे जिल्ह्यात खोळंबली आहेत. भविष्यात तर असे प्रकार होऊ नयेत अशी अपेक्षा ठेवूत.