नगरनाक्यावर केलेल्या खोदकामामुळे कोणाचा बळी गेल्यास जबाबदार कोण?
काम करताना सर्वच नियम बसवले धाब्यावर
मुख्य रस्ता खोदल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास
अनेक गाड्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये फसू लागल्या: सारखीच होतेय वाहतूक कोंडी
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : एक तर बीड शहरामध्ये अनेक भागातील रस्ते खराब असून त्यात काही कामाच्या नावाखाली काही गुत्तेदार बीड शहरात मनमानी करताना दिसत आहेत. बीड शहरामध्ये प्राधिकरण विभागाच्या वतीने नगरनाका परिसरात अंडरग्राऊंड पाईपलाईनसाठी काही खड्डे खोदण्यात आले आहेत परंतु हे काम करत असताना संबंधित गुत्तेदाराने कोणत्याही नियमाचे पालन केल्याचे याठिकाणी दिसत नाही, मुख्य रस्त्याचे काम करायचे असेल तर सर्वप्रथम त्याठिकाणी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते परंतु तसे याठिकाणी झालेच नाही. चक्क गुत्तेदाराने खड्डा खोदल्यानंतर खड्डा भरण्यासाठी मातीचा वापर केल्यामुळे नगर नाका परिसर चिखलमय झाला आहे. यामुळे याठिकाणी अवजड वाहने व तीन चाकी चार चाकी वाहने या चिखलात फसत आहेत. यामुळे सध्या नगरनाका परिसरामध्ये वाहतुक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. याठिकाणी जर कोणाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.
नगरनाका परिसरात प्राधिकरण विभागाकडून अंडरग्राऊंड पाईपलाईनचे काम सुरू आहे. हे काम सर्वसामान्यांसाठी फायद्याचे जरी असले तरी हे काम करताना जी खबरदारी संबंधित गुत्तेदाराने घेणे गरजेचे आहे ती खबरदारी येथील गुत्तेदाराने न घेतल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून नगरनाका परिसरामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. नगरनाका परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या परिसरात शाळकरी मुलांचा वावर जास्त आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी हे सायकलवर प्रवास करतात परंतु याठिकाणी निर्माण झालेल्या चिखमलमय रस्त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या सायकल स्लिप होवू लागल्या आहेत. तसेच वयोवृद्ध नागरिक सुद्धा खरेदीसाठी या भागात जास्त येतात, त्यांना सुद्धा याठिकाणी आल्यानंतर विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. तसेच वाहनधारकांना तर आपले वाहन याठिकाणी फसल्यानंतर दुसरे वाहन आणून दे वाहन सुद्धा ओढून काढण्याची वेळ येत आहे. एवढ्या सर्व समस्या होवून सुद्धा संबंधित गुत्तेदार हा त्याची मनमानी करताना दिसत आहे. एक तर या गुत्तेदाराने काम करण्यापूर्वी जी खबरदारी घेणे ती गरजेचे होते ती खबरदारी घेतली नाही तर दुसरीकडे हजारो नागरिकांना तो वेठीस धरू लागला आहे. यामुळे तात्काळ जिल्हाधिकारी यांनी संबंधित गुत्तेदारावर कारवाई करून नगरनाका परिसरातील सुरू असलेला हा खेळखंडोबा बंद करावा अशी मागणी होत आहे.