आज शिंदे-फडणवीस यांच्या उपस्थितीत आष्टी – अहमदनगर रेल्वेचा शुभारंभ..!
बीड : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात गेली अनेक वर्षापासूनचे बीड जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथराव शिंदे, उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, रेल्वे राज्य मंत्री मा. रावसाहेब दानवे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, महसूल मंत्री मा. राधाकृष विखे पा., खा.डॉ. प्रितमताई मुंडे, यांच्या सह जिल्हातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी रेल्वे स्थानक येथे सकाळी 11.00 वा. संपन्न होणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के दिली आहे.
बीड जिल्हा हा शेतकरी, कष्टकरी व उसतोड कामगारांचा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने अहमदनगर बीड रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. मराठवाड्यातील बीड वगळता प्रत्येक जिल्हा रेल्वे मार्गाला जोडला आहे. यामुळे बीड जिल्ह्याचा विकास गतिमान होऊ शकला नाही. बीड मधील सर्व स्तरातील नागरिकांनी बीड रेल्वे साठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न गाजत राहिला. जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी पुढाकार घेऊन, स्वप्नाला आकार दिला. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. तत्कालीन भाजपाचे मुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री पंकजाताई यांच्या पुढाकारातून रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून पन्नास टक्के हिस्सा हा वेळोवेळी मिळत राहिला. मध्यंतरी सरकार बदलल्याने कामाचा वेग मंदावला होता. राज्यात पुन्हा शिंदे- फडणवीसांचे सरकार आल्यानंतर बीड रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा भरीव निधी पंकजाताई आणि प्रितमताई यांच्या सातत्य पूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाला. रेल्वे मार्गाचे काम गतिमान झाले. आज खऱ्या अर्थाने गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न साकार होत आहे.
नगर-बीड- परळी रेल्वे मार्गाला 1990 ला मान्यता मिळूनही हा प्रकल्प गेली पंचवीस वर्षापासून रखडला होता. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर या प्रकल्पाने खऱ्या अर्थाने वेग घेतला. आता नगर ते परळी या 261 कि.मी. मार्गापैकी 60 कि.मी. चे काम पूर्ण झाले आहे. आष्टी ते बीड, बीड ते परळी हे काम सुद्धा वेगाने चालू आहे. काही दिवसातच बीड शहरातही रेल्वे येईल. यात तिळमात्र शंका नाही.
नगर- आष्टी रेल्वे चा शुभारंभ जिल्हावासीयांसाठी सुवर्णक्षण असून, हा विकासाचा राजमार्ग देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्या सरकारमुळे निर्माण झाला आहे. जिल्ह्याचा भाग्योदय घडवणाऱ्या रेल्वे शुभारंभ प्रसंगी जिल्हावासीयांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
अहमदनगर – आष्टी रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी 11.00 वा. राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेबजी दानवे, महसूलमंत्री राधाकृष विखे पाटील लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
आज जिल्ह्याच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे , आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आष्टी रेल्वे स्थानक येथे जावून, लोकार्पण कार्यक्रम पूर्व तयारीची पाहणी केली.यावेळी रेल्वे प्रशासन, व राज्य महसूल विभागातील अधिकारी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.