बीड प्रतिनिधी : अहमदनगर ते परळी रेल्वे मार्ग पुर्ण व्हावा यासाठी सातत्याने आंदोलन उभा करुन शासन दरबारी मागणी करणार्या रेल्वे संघर्ष कृती समिती, युक्रांद संघटना, स्वातंत्र्य सैनिक संघटना, नागरी युवक संघटना यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते परंतू त्यांनी सदरील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यापैकी एकाही संघटनेला निमंत्रण नसल्याने सदरील कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे माजी आ.राजेंद्रजी जगताप, माजी आ.जनार्धन तुपे, सुशीलाताई मोराळे यांनी कळविले आहे.
पुढे पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्हा रेल्वे संघर्ष समितीने गल्ली ते दिल्लीपर्यंत जावून आंदोलन केली, निवेदने देवून मागण्या केल्या.तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांची केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे बैठक घेतली होती त्यावेळेस रेल्वेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. तसेच तात्कालीन पालकमंत्री कै. विमलताई मुंदडा, तत्कालीन मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांची भेट घेवून राज्यशासनामार्फत रेल्वेसाठी 50 टक्के निधी देण्यात यावा अशी मागणी करुन निधी उपलब्ध करुन घेण्यात आला.
रेल्वे आंदोलन उभा करण्यास कै.अमोल गलधर यांचा देखील यामध्ये मोठा सहभाग होता. अशातच 2009 साली 155 रेल्वे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे 2019 साली मागे घेण्यात आले. इतके सारे प्रयत्न अहमदनगर ते बीड-परळी या मार्गावरुन रेल्वे यावी यासाठी बीडमधील रेल्वे संघर्ष कृती समिती, युक्रांद संघटना, स्वातंत्र्य सैनिक संघटना, नागरी युवक संघटना यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले असतांना देखील 23 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण नसल्याने माजी आ.राजेंद्र जगताप, माजी आ.जनार्धन तुपे, सुशीलाताई मोराळे यांनी बहिष्कार टाकला असल्याचे कळवले आहे.
तसेच बीड जिल्हा रेल्वे संघर्ष समिती तर्फे रेल्वे आंदोलकांचा मेळावा घेण्यात येवून रेल्वे मार्गाचे प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती माजी आ.राजेंद्रजी जगताप यांनी दिली.